‘संजय राऊत माझा माल, रेकीसाठी त्यांनीच…’, गुलाबराव पाटलांचा जोरदार टोला

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या मुंबईतील घराची रेकी झाल्याचा प्रकार समोर आला. त्यावर विरोधकांकडून रान उठवले जात आहे. संजय राऊत यांच्या सुरक्षेची मागणी होत आहे. या विषयावर फडणवीस सरकारमधील कॅबिनेट मंत्री आणि शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी वक्तव्य केले आहे. त्यांनी संजय राऊत यांना आपला माल म्हटले आहे.

काय म्हणाले गुलाबराव पाटील?

गुलाबराव पाटील म्हणाले की, संजय राऊत यांच्या घराची रेकी कोणी करणार? तो माझा माल आहे. रेकी करण्यासाठी संजय राऊत यांनीच माणसे पाठवली असतील, असा टोला राज्याचे कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांना लगावला. शिवसेनेत बंड झाल्यानंतर संजय राऊत आणि गुलाबराव पाटील यांच्यात नेहमीच आरोप-प्रत्यारोप होत असतात. दरम्यान, मंत्रिमंडळाचे खाते वाटप एक-दोन दिवसांत होणार असल्याचे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

राऊत यांची मोदी, शाह अन् फडणवीस यांच्यावर टीका

घराची रेकी झाल्यानंतर संजय राऊत भांडूपमध्ये आले. त्यांनी या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. मोदी, शाह आणि फडणवीस यांना आपला आवाज बंद करायचा आहे, असा आरोप त्यांनी केला. माझा पोलिसांवर विश्वास आहे.मुंबई पोलीस या घटनेचा तपास करण्यास सक्षम आहे, असे राऊत यांनी सांगितले.

रेकी प्रकरणात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वरिष्ठ पोलिसांशी बातचीत केली आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, मला मुंबई पोलीस विश्वास आहे. माझी सुरक्षा सामनाचा संपादक असल्यापासून होती.  उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना माझी सुरक्षा कायम होती. नवीन सरकार आले अडीच वर्षापूर्वी तेव्हा राजकीय विरोधकांची सुरक्षा काढून घेतली.परंतु मी महायुतीवर टीका करतो म्हणजे ते मला शत्रू समजतात. आम्ही राजकारणात टीका करतो तर तुम्ही आम्हाला शत्रू समजतात या पद्धतीचे राजकारण कधीच झाले नाही. माझ्या घरावर पाळत ठेवणे हे नवीन नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)