बदलत्या हवामानात कोंड्याची समस्या वाढतेय? ‘या’ टिप्स करा फॉलो

बदलत्या हवामानाचा परिणाम केवळ आरोग्यावरच नाही तर केस आणि त्वचेवरही दिसून येतो. अशावेळी केसांमध्ये कोंडा आणि तेलकट टाळूची समस्या खूप सतावत असते. पण कधीकधी डोक्यातील कोंड्याची समस्या खूप तीव्र होते आणि त्यामुळे आपल्या टाळूत अतिरिक्त तेलकटपणा, खाज सुटणे आणि केस गळणे यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. अशा परिस्थितीत तुम्ही कोंडा कमी करणे महत्वाचे आहे.

आजकाल बाजारात केसांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी महागडे उत्पादने उपलब्ध आहेत. काहींना असे वाटते या महागड्या उत्पादनाच्या वापराने कोंड्यापासून मुक्त होण्यास मदत होऊ शकते. पण काही दिवसांनी ही समस्या पुन्हा उद्भवू शकते. अशातच तुम्हाला जर नैसर्गिक म्हणजेच घरगुती पद्धतीने कोंडा कमी करायचा असेल तर तुम्ही त्यासाठी घरात असलेल्या काही गोष्टींचा वापर करू शकतात. यामुळे कोंडा कमी होण्यास मदत होऊ शकते.

नारळाचे तेल

नारळाच्या तेलात अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात, जे टाळू निरोगी ठेवण्यास मदत करतात. टाळूची मालिश करून केसांना नारळाचे तेल लावल्याने कोंड्याची समस्या कमी होण्यास मदत होते. नारळाचे तेल टाळूवर लावा आणि हलक्या हाताने मसाज करा आणि 1 ते 3 तासांनी शॅम्पू करा. तुम्ही आठवड्यातून दोनदा असे केल्याने कोंड्याची समस्या लवकरच कमी होईल.

कडुलिंबाच्या झाडाची पाने

कडुलिंबाची पाने टाळू निरोगी ठेवण्यास खुप मदत करतात. हे जिवाणू आणि बुरशीजन्य संसर्गापासून आपल्या केसांचे संरक्षण करतात. अशा परिस्थितीत तुम्ही कडुलिंबाची पाने उकळुन घ्या आणि ते पाणी थंड होऊ द्या. यानंतर हे पाणी टाळूवर लावा. यामुळे कोंडा कमी होण्यास देखील मदत होऊ शकते. याशिवाय, तुम्ही कडुलिंबाच्या पानांचा हेअर मास्क बनवूनही लावू शकता.यासाठी काही कडुलिंबाची पाने धुतल्यानंतर, त्यांना बारीक करून पेस्ट बनवा. यानंतर, त्यात खोबरेल तेल घालून पेस्ट बनवा आणि 15 ते 20 मिनिटे केसांना लावा आणि नंतर शॅम्पू करा.

टी ट्री ऑईल

टी ट्री ऑईलमध्ये अँटीफंगल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, ज्यामुळे कोंड्याची समस्या कमी होण्यास मदत होते. टी ट्री ऑईल नारळाच्या तेलात मिक्स करून टाळूवर लावा आणि 30 मिनिटांनी केस शॅम्पूने धुवा. तुम्ही आठवड्यातून दोनदा टी ट्री ऑईल केसांना लावू शकता. पण जर तुम्ही पहिल्यांदाच केसांवर टी ट्री ऑइल किंवा कोणतीही नैसर्गिक गोष्ट लावत असाल तर याचा पॅच टेस्ट नक्की करा.

तुमचे केस नियमितपणे धुवा.

आठवड्यातून दोनदा केस शाम्पूने धुवावेत, कारण टाळूवर साचलेली धूळ आणि तेल तुमच्या केसांमध्ये कोंडा निर्माण करू शकते. यासाठी तुम्ही केस धुताना सौम्य शाम्पू वापरा. तसेच केस नैसर्गिकरित्या सुकवा.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)