Flamingo Park: भांडुप येथे फ्लेमिंगो पार्क उभारणार; पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांची घोषणा

मुंबई : मुंबई उपनगर जिल्ह्यातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि झोपडपट्टी भागातील सुधारण्यासाठी भरीव उपाययोजनांकरिता २०२४-२५ मध्ये जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) १०१२ कोटी, अनुसूचित जाती उपयोजना ७१ कोटी व आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील योजना (ओटीएसपी) अंतर्गत ५.७१ कोटी अशा एकूण १०८८.७१ कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. तसेच, भांडुप येथे फ्लेंमिंगो पार्क विकासित केले जाणार असून सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी हिरकणी कक्ष उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीची बैठक शुक्रवारी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. या बैठकीला मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, खासदार संजय दिना पाटील, आमदार प्रवीण दरेकर, आमदार मनीषा चौधरी, आमदार विद्या ठाकूर, आमदार डॉ. भारती लव्हेकर, आमदार अतुल भातखळकर, आमदार नवाब मलिक आदी उपस्थित होते.

नियोजन विभागाकडून आज अखेर २०२४-२५साठी ३३७.३९ कोटी रुपयांचा एकूण निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. २०२४-२५ मध्ये आज अखेर १९.९० कोटी रकमेच्या नवीन कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली असून २०२३-२४ मध्ये प्रशासकीय मान्यता देण्यात आलेल्या कामांचा उर्वरित निधी रुपये १८५.५६ कोटी वितरित करण्यात आला आहे. प्राप्त निधीपैकी ५१ टक्के निधी खर्च करण्यात आला आहे. खर्चाच्या बाबतीत मुंबई उपनगर जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे, असे लोढा म्हणाले. त्याचवेळी उपनगरातील झोपडपट्टीवासीयांच्या सार्वजनिक जीवनमानात सुधारणा करणेसाठी खर्च करणेबाबत सूचित केले आहे. या अंतर्गत रस्ते, सांडपाणी व्यवस्था, पाणीपुरवठा, विद्युत व्यवस्था, सार्वजनिक जमिनीवर खेळाची मैदाने, अंगणवाड्यांची स्थापना, उद्यानांची निर्मिती अशा प्रकारच्या कामे तसेच झोपडपट्टी भागातील बेरोजगारांसाठी कौशल्य विकास, आरोग्य सुविधांचा विकास इत्यादी प्रकल्प हाती घेण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.
Heroin Seized In Assam: साबणाच्या खोक्या लपवले होते कोटींचे ‘हेरॉइन’; आसाममध्ये चार तस्करांना अटक
कशासाठी किती निधी?

– नागरी दलितेतर वस्त्यांची सुधारणा- ५७४.७८ कोटी
– झोपडपट्टीवासीयांचे स्थलांतर व पुनर्वसन योजनेंतर्गत संरक्षक भिंत बांधकामे- ११५.०० कोटी
– कौशल्य विकास कार्यक्रम- ६ कोटी
– दलितवस्ती सुधार योजना- ६५.४८ कोटी
– पोलिस व तुरुंग यांच्यासाठी विविध आस्थापनांकरिता पायाभूत सुविधा पुरवणे- १२.४४ कोटी
– व्यायामशाळा व क्रीडांगणांचा विकास- १५ कोटी
– गतिमान प्रशासन तथा आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण- ४.५० कोटी
– महिला व बालविकास ३ टक्के निधीमध्ये- १२.४४ कोटी
– हिरकणी कक्ष- ५० कोटी