मोठी बातमी समोर येत आहे, गुरुवारी कल्याणमधील एका हायप्रोफाईल सोसायटीमध्ये मराठी कुटुंबावर हल्ला झाला, ही घटना ताजी असतानाच आता ठाण्यातूनही एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ठाण्यातील विवियाना मॉल परिसरातील ही घटना आहे. विविआना मॉलमधील परप्रांतीय सुरक्षा रक्षकाकडून महिला रिक्षा चालकाला मारहाण करण्यात आली आहे. मनसेकडून या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली असून, या घटनेबाबत जाब विचारण्यासाठी मनसे नेते अविनाश जाधव आणि कार्यकर्ते विवियाना मॉलमध्ये पोहोचले आहेत.
भाडे नाकारल्याच्या वादातून मारहाण
समोर आलेल्या माहितीनुसार ठाण्यातील विविआना मॉलमधील परप्रांतीय सुरक्षा रक्षकाने महिला रिक्षा चालकाला मारहाण केली आहे. मॉलमध्ये खरेदीसाठी आलेल्या ग्राहकाचं भाडं नाकारल्याच्या वादतून ही मारहाण झाल्याची माहिती समोर येत आहे. मॉलमध्ये खरेदीसाठी आलेल्या ग्राहकानं या महिला रिक्षाचालकाकडे भाड्या बाबत विचारणा केली, मात्र या महिलेनं त्यांना आपल्या रिक्षातील गॅस संपला आहे, असं सांगितलं. त्यानंतर यावरून महिला रिक्षा चालक आणि या मॉलचा सुरक्षा रक्षक यांच्यामध्ये वाद झाला. सुरक्षा रक्षकाने अरेरावीची भाषा केल्यामुळे महिला रिक्षा चालक त्याच्या अंगावर धावून गेली, त्यानंतर या सुरक्षा रक्षकाने महिलेला मारहाण केल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान या घटनेची दखल आता मनसेकडून घेण्यात आली आहे. या घटनेबाबत जाब विचारण्यासाठी मनसे नेते अविनाश जाधव आणि कार्यकर्ते विवियाना मॉलमध्ये पोहोचले आहेत.
दरम्यान कल्याणमध्ये देखील अशीच एक घटना घडली आहे, एका हायप्रोफाईल सोसायटीमध्ये गुरुवारी जोरदार राडा झाला. दोन परप्रांतीय कुटुंबांकडून एका मराठी कुटुंबाला शिविगाळ करत लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली आहे. कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला झालेल्या मारहाण प्रकरणात खडकपाडा पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतलं आहे. मात्र मुख्य आरोपी अखिलेश शुक्ला अजूनही फरार आहे. यावरून आता राजकारण चांगलच तापलं आहे. राजकीय पक्षांकडून एकमेकांवर आरोप केले जात असल्याचं पाहायला मिळत आहे. मराठी कुटुंबानंतर आता एका मराठी महिलेला देखील परप्रातीयाकडून मारहाण करण्यात आली आहे.