बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीचे प्रसिद्ध संगीतकार प्रीतम चक्रवर्ती यांच्या ऑफिसमध्ये काही दिवसांपूर्वी चोरी झाली होती. यावेळी प्रीतम चक्रवर्ती यांच्या ऑफिसमधील 40 लाख रुपयांची रोकड लंपास करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. आता याप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. प्रीतम चक्रवर्ती यांच्या ऑफिसमधून ४० लाखांची रोकड चोरी करणाऱ्याला जम्मू काश्मीरमधून अटक करण्यात आली आहे. त्याने ही चोरी करण्यामागचे कारणही समोर आले आहे.
नेमकं प्रकरण काय?
प्रीतम चक्रवर्ती यांचा स्टुडिओ युनिमस रेकॉर्ड प्रायव्हेट लिमिटेड गोरेगाव-मालाड लिंक रोड येथील रुस्तमजी ओजोन बिल्डिंगमध्ये आहे. या स्टुडिओमध्ये ४ फेब्रुवारीला दुपारी २ वाजता चोरी झाली. या स्टुडिओमध्ये काम करणारा एक व्यक्ती दुपारी आला. त्याने निर्माता मधु मनटेनाचं नाव सांगत कामाच्या बहाण्याने ४० लाखांची बॅग घेतली आणि तो फरार झाला. आशिष सायाल असे चोरी करणाऱ्या व्यक्तीचे नाव होतं. याप्रकरणी प्रीतम यांच्या मॅनेजरने मुंबईतील मालाड पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
यानंतर पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास केला जात होता. अखेर आज या घटनेतील मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील मालाड येथे राहणाऱ्या संगीतकार आणि गायक प्रीतम चक्रवर्ती यांच्या स्टुडिओमध्ये ४० लाख रुपये असलेली ट्रॉली बॅग ठेवण्यात आली होती. आरोपीने ट्रॉली बॅगसह ही रक्कम चोरली आणि संधी मिळताच पळून गेला. या प्रकरणात मालाड पोलिसांनी एका आरोपीला अटक केली.
जम्मू -काश्मीरकडून अटक
अटक केलेल्या आरोपीचे नाव आशिष बोटिराम सय्यल असे असून तो 32 वर्षांचा आहे. त्याला जम्मू -काश्मीरकडून अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या आरोपीकडून पोलिसांनी 37 लाख, एक लॅपटॉप आणि एक मोबाईल जप्त केला आहे. या आरोपीला गाणे आणि थेट संगीत बनवायचे होते. त्याला संधी मिळत नव्हती. त्यामुळे त्याने ही चोरी केल्याचे तपासात उघडकीस आले.