महाराष्ट्र 2047 व्हिजन ते गुंतवणूक, नीती आयोगाच्या बैठकीतील फडणवीसांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

नुकतीच नीती आयोगाची महत्त्वाची बैठक पार पडली, या बैठकीमध्ये भाषण करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात सध्या सुरू असलेल्या विविध योजनांबाबत आणि भविष्यात राबवण्यात येणाऱ्या योजनांसंदर्भात माहिती दिली.

फडणवीस यांच्या भाषणातील ठळक मुद्दे  

भारतीय सैन्य दल आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे ‘ऑपरेशन सिंदूर’ बद्दल हृदयपूर्वक आभार आणि अभिनंदन. मोदीजींच्या दहशतवादाविरोधात झिरो टॉलरन्सचा संकल्प यातून अधोरेखित होतो.

राष्ट्रीय धोरणानुसार, महाराष्ट्र सरकार सुद्धा महाराष्ट्र 2047 असे व्हीजन तीन टप्प्यात तयार करीत आहे. 100 दिवसांच्या सुशासन, नागरिक केंद्रीत उपाययोजना आणि उत्तरदायित्त्व अशा सूत्रावर एक कार्यक्रम आमच्या सरकारने हाती घेतला. यात विविध विभागांनी 700 हून अधिक उद्दिष्ट साध्य केले.

आता दीडशे दिवसांचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. यात 2047 साठी दीर्घकालीन, महाराष्ट्र आपला अमृत महोत्सव साजरा करेल, त्या कालावधीचे म्हणजे 2035 साठी आणि प्रतिवर्षाच्या उद्दिष्टांसह 2029 साठीचे अल्पकालिक 5 वर्षांचे असे व्हीजन तयार करण्यात येत आहे.

विद्यमान अर्थव्यवस्था 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर्स आणि 2047 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलर्सची करणे, हा आमचा मुख्य उद्देश आहे. नवीन उद्योग धोरणाचा उद्देश जीडीपीत उत्पादन क्षेत्राचे योगदान 20 टक्क्यांच्या वर आणणे हा आहे. मैत्री 2.0 ही सिंगल विंडो क्लिअरन्स प्रणाली कार्यान्वित करण्यात आली असून, ईव्ही, सेमिकंडक्टर, ग्रीन हायड्रोजन, डेटा सेंटर्स यासारख्या नवक्षेत्रांना प्रोत्साहित करण्यात येत आहे.

2024-25 या पहिल्या तिमाहीत देशात सर्वाधिक 1.39 लाख कोटींची परकीय गुंतवणूक आकर्षित केली आहे. दावोस वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये 15.96 लाख कोटींचे सामंजस्य करार केले. त्यातील 50 टक्के प्रस्तावांवर प्रक्रिया सुरु झाली असून, त्यातील अधिकाधिक गुंतवणूक ही दुसर्‍या आणि तिसर्‍या श्रेणीतील शहरांमध्ये होत आहे.

विकासाला गती देण्यासाठी पायाभूत सुविधा, विविध सुधारणा आणि रोजगार वाढविण्यावर आमचा भर आहे. समृद्धी महामार्ग, अटलसेतू, कोस्टर रोड आदी प्रकल्प महाराष्ट्राच्या विकासाला आणि पायाभूत क्षेत्रातील क्रांतीला गती देत आहेत. वाढवण पोर्ट, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो, रेल्वे, मल्टीमॉडेल लॉजिस्टिक पार्क हे क्षेत्रीय विकासाला चालना देणार असून, त्यासाठी आम्ही पंतप्रधान महोदयांचे आभारी आहोत, असं यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी म्हटलं.

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी देशाचे नवे सरन्यायाधीश भूषण गवई यांची देखील भेट घेतली. त्यांना विधानमंडळात सर्वपक्षीय सत्कार तसेच, भारतीय संविधान याविषयावर मार्गदर्शनपर व्याख्यानासाठी वेळ देण्याची विनंती यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)