आजच्या डिजिटल युगात स्मार्टफोन आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. संवाद साधणे, मनोरंजन, माहिती मिळवणे आणि अगदी कामाचे व्यवहारही स्मार्टफोनद्वारे होतात. पण याच स्मार्टफोनचा अति वापर आपल्या डोळ्यांसाठी घातक ठरू शकतो, असं नेत्रतज्ज्ञांचं स्पष्ट मत आहे. विशेषतः जर आपण योग्य अंतरावर फोन न ठेवता सतत डोळ्यांवर ताण देत असाल, तर त्याचे परिणाम गंभीर होऊ शकतात.
तज्ज्ञ काय सांगतात ?
तज्ज्ञांच्या मते, स्मार्टफोन डोळ्यांपासून किमान 16 ते 18 इंच (सुमारे 40 ते 45 सेंटीमीटर) अंतरावर ठेवणं आवश्यक आहे. हे अंतर ‘सुरक्षित वाचन अंतर’ म्हणून ओळखलं जातं. यापेक्षा कमी अंतरावर फोन वापरल्यास डोळ्यांवर ताण येतो, ज्यामुळे डोळ्यांची दृष्टी कमी होण्याची, थकवा जाणवण्याची, डोळे कोरडे होण्याची आणि डोळ्यांत जळजळ होण्याची शक्यता वाढते.
स्मार्टफोन पहाताना काय लक्षात ठेवाल ?
1. स्मार्टफोन पाहताना नेहमी खाली बघण्याच्या कोनात फोन ठेवावा, म्हणजे स्क्रीन डोळ्याच्या थोडा खाली असावी. यामुळे डोळ्यांना कमी ताण येतो आणि स्क्रीनचा प्रकाश थेट डोळ्यांवर आदळत नाही. तसेच, स्क्रीनची ब्राइटनेस लेव्हल फार जास्त किंवा खूप कमी असू नये, तर ती सभोवतालच्या प्रकाशानुसार समायोजित केलेली असावी.
2. “20-20-20 नियम” हा देखील डोळ्यांचं आरोग्य राखण्यासाठी उपयुक्त ठरतो. म्हणजे दर 20 मिनिटांनी स्क्रीनकडून नजर हटवून 20 फूट दूरवर असणाऱ्या एखाद्या वस्तूकडे 20 सेकंद बघावं. यामुळे डोळ्यांवरचा ताण कमी होतो आणि दृष्टी दीर्घकाल टिकते.
3. मुले आणि किशोरवयीन मुलांमध्येही स्मार्टफोनचा वापर वाढल्यामुळे डोळ्यांशी संबंधित समस्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. त्यामुळे पालकांनी मुलांच्या स्क्रीनटाईमवर नियंत्रण ठेवणं, आणि फोन योग्य अंतरावर वापरण्याची सवय लावणं आवश्यक आहे.
4. शिवाय, झोपण्याच्या एक तास आधीपासून स्मार्टफोनचा वापर बंद करणं ही एक चांगला सवय आहे. कारण स्क्रीनमधील ब्लू लाईट मुळे झोपेच्या हार्मोनवर परिणाम होतो आणि झोपेत अडथळा निर्माण होतो. ब्लू लाईट फिल्टर किंवा नाईट मोड वापरणे हा त्यावर एक उपाय ठरू शकतो.