EVM Hacking Row:  उद्धव ठाकरे गटाला धक्का, आमदार विलास पोतनीस यांच्यावर गुन्हा दाखल

मुंबई : ‘मुंबई उत्तर-पश्चिम’मधील मतमोजणीवरून वाद सुरू असताना आणि यावरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना ठाकरे गटाचे आमदार विलास पोतनीस यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मतमोजणीच्या दिवशी नेस्को येथील मुंबई उत्तर पश्चिम मतमोजणी केंद्रात विनापरवाना प्रवेश केल्याचा आरोप करून विलास पोतनीस आणि त्यांच्या सशस्त्र पोलीस सुरक्षा रक्षकाविरोधात रविवारी रात्री उशिरा वनराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. रवींद्र वायकर यांच्या मेहुण्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे आमदार विलास पोतनीस यांच्या विरोधात देखील गुन्ह्याची नोंद झाल्याने वातावरण अधिकच तापण्याची शक्यता आहे.

लोकसभेच्या उत्तर-पश्चिम मुंबई मतदारसंघाचे शिवसेना उमेदवार, विजयी खासदार रवींद्र वायकर यांच्या एका नातेवाइकाचा फोन मतमोजणीच्या दिवशी ‘ईव्हीएम’शी जोडलेला होता, असा दावा करणारे वृत्त एका वृत्तपत्राने प्रकाशित केल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. रवींद्र वायकर यांचा मुंबई उत्तर-पश्चिम’ मतदारसंघातून ४८ मतांनी विजय झालेला आहे.
Ravindra Waikar: तो मोबाइल इव्हीएमशी जोडलेला, वायकरांच्या मेहुण्यावर अटकेची टांगती तलवार

विलास पोतनीस यांच्याविरोधात गुन्हा दाखल

मतमोजणी केंद्रात मोबाईल फोनचा वापर केल्याचे सिद्ध झाल्यानंतर रवींद्र वायकर यांच्या मेहुण्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर आता ठाकरे गटाचे आमदार विलास पोतनीस यांच्याविरोधातही पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेतला. मतमोजणीच्या दिवशी नेस्को येथील मुंबई उत्तर पश्चिम मतमोजणी केंद्रात विनापरवाना प्रवेश केल्याचा आरोप करून भारतीय दंड विधान संहिता कलम १८८ आणि १२८ (२) लोकप्रतिनिधित्व कायद्यान्वये पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
Explained : EVM अनलॉक करण्यासाठी मोबाईलवर खरंच OTP येतो? निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून सत्यता समोर

निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण देताना काय म्हटलेय?

मतदानयंत्र ‘अनलॉक’ करण्यासाठी मोबाइलवर ‘ओटीपी’ येत नाही. कारण या यंत्रात वायरलेस संदेशवहनाची क्षमता नाही. मतदानयंत्राचे कोणत्याही प्रकारे हॅकिंग शक्य नसून, त्यात कुठल्याही प्रकारचा फेरफार करता येत नाही. यामुळे संबंधित वृत्तपत्राला बदनामीबाबत नोटीस बजावण्यात आली आहे, असे मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यंवशी यांनी स्पष्ट केले.

ईव्हीएमवरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी

संस्थांमध्ये उत्तरदायित्वाचा अभाव असेल तर लोकशाही फसवी आणि फसवणुकीला बळी पडते, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी ‘एक्स’वर ‘ईव्हीएम’विरोधी सूर लावला. शिवसेना (उबाठा) आमदार आदित्य ठाकरे, खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनीही हे वृत्त प्रसारित करून मतमोजणीच्या वेळचे सीसीटीव्ही फुटेज जारी करण्याची मागणी केली. भाजपने मात्र विरोधकांवर टीकास्त्र सोडले. ‘ईव्हीएम’बाबत खोटी बातमी प्रसारित करून खोटे रेटून बोलणाऱ्या विरोधी पक्षांच्या नेत्यांवर निवडणूक आयोगाने खटला चालवायला हवा, अशी मागणी भाजपने केली.