मोठी बातमी समोर येत आहे. येत्या पाच डिसेंबरला मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे. मात्र त्यापूर्वीच महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुरुवारी आपल्या मुळगावी साताऱ्यातील दरे गावात आले आहेत. मात्र आता त्यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर येत आहे. त्यांना त्रास जाणवू लागल्यानं ते आपल्या निवासस्थानीच विश्रांती घेत आहेत. एकनाथ शिंदे यांची प्रकती बिघडल्यानं डॉक्टरांचं पथक तपासणीसाठी त्यांच्या दरे येथील निवासस्थानी दाखल झालं आहे. मुख्यमंत्रिपद आणि गृहमंत्रिपदाची चर्चा सुरू असतानाच अचानक एकनाथ शिंदे हे आपल्या मुळगावी दरे येथे आल्यानं राजकीय वर्तुळाच चर्चेला उधाण आलं आहे. यावर आता शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नेमंक काय म्हणाले सामंत?
एकनाथ शिंदे नाराज असल्यानं ते आपल्या मुळगावी दरे येथे आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे, यावर प्रतिक्रिया देताना उदय सामंत यांनी म्हटलं की, एकनाथ शिंदे हे नाराज आहेत म्हणून ते आपल्या गावी दरे येथे आले असं म्हणणं चुकीचं आहे. मला वाटतं त्यांनी एका वाक्यात आपलं व्यक्तीमहत्त्व महाराष्ट्रासमोर आणलं आहे. मी नाराज होऊन रडणारा नाही तर लढणारा आहे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे प्रत्येकाला धावपळीमुळे काही आरोग्याच्या अडचणी निर्माण होतात. धावपळीमुळे त्यांना त्रास जाणवला असेल असं सामंत यांनी म्हटलं आहे.
गृहमंत्रिपदासाठी अग्रही
दरम्यान सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीप्रमाणे एकनाथ शिंदे हे गृहमंत्रिपदासाठी अग्रही आहेत. ते गृहमंत्रिपदावर अडून बसले आहेत. गृहमंत्रिपद दिलं तरच उपमुख्यमंत्रिपद स्विकारू अशी त्यांची भूमिका असल्याची माहिती समोर येत आहे. गृहमंत्रिपद जर एकनाथ शिंदे यांना मिळालं नाही तर उपमुख्यमंत्रिपद शिवसेनेतील दुसऱ्या एखाद्या वरिष्ठ नेत्याला मिळण्याची शक्यता आहे. मात्र दुसरीकडे भाजप देखील गृहमंत्रिपदावरील आपला दावा सोडण्यास तयार नाहीये. त्यामुळे आता गृहमंत्रिपद नेमकं कोणाला मिळणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.