Eknath Shinde : शपथविधी आधी हायव्होल्टेज ड्रामा, शिंदे नाराज, वर्षावर कोण पोहोचलं? पडद्यामागे काय-काय घडतय?

मुंबईच्या आझाद मैदानात आज महायुती सरकारचा शपथविधी होणार आहे. या शपथविधी सोहळ्याला तीन तास उरले असताना पडद्यामागे हायव्होल्टेज ड्रामा सुरु आहे. कारण शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार की नाही? हे अजून स्पष्ट नाहीय. शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले, संजय शिरसाट आणि उदय सामंत हे आमदार एकनाथ शिंदेंची मनधरणी करण्यासाठी वर्षावर पोहोचले आहेत. हा सगळा पेच गृहमंत्री पदावरुन फसल्याच बोललं जातय. दरम्यान दुसऱ्याबाजूला दीपक केसरकर यांनी देवगिरीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांची भेट घेतली आहे. पडद्यामागे वेगाने या सर्व घडामोडी घडत आहेत. गृहमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे ठाम आहेत. पण अजूनही त्यावर तोडगा निघालेला नाही.

दरम्यान एकनाथ शिंदे जो काय निर्णय घेतील, तो आपल्याला मान्य असेल असं पाटणचे आमदार शंभूराज देसाई म्हणाले. काल राज्यपालांना भेटून आल्यानंतर पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांना पत्रकाराने उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार का? असा प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी संध्याकाळपर्यंत थांबण्याचा सल्ला दिला होता. पण अजून निर्णय झालेला नाही. त्यामुळे भाजपा गृहखात न सोडण्याच्या मानसिकतेत असल्याच स्पष्ट होतं.

‘आमचं राजकीय करियर त्यांच्या हाती’

“आमच्यापैकी कोणाचेही नाव येऊ नये, ही प्रामणिक इच्छा आहे. आमच्यापैकी कोणाच्याही मनात खुर्चीवर कोणीतरी जाऊन बसावं असा उद्देश नाही. हे जाहीरपणे खुलासा करावा लागण हे अत्यंत दुर्देवी आहे. आम्ही एकनाथ शिंदे यांना नेता मानतो. आमचं राजकीय करियर त्यांच्या हाती दिलेलं आहे. त्यांना डावलून कोणी काही करत असेल तर गप्प बसणार नाही. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असावेत ही आमची कायमस्वरुपी भूमिका आहे” असं उदय सामंत म्हणाले.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)