Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांमधला देवदूत! अपघातग्रस्तांना मदतीचा हात, ताफ्यातील गाडीतून रुग्णालयात पाठवलं

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संवेदनशील स्वभावाचा पुन्हा एकदा प्रत्यय आला असून रस्त्यावर अपघातग्रस्तासाठी ते देवदूत ठरले. काल रात्री दीड वाजता पूर्व द्रुतगती महामार्गावरून ठाण्यातील आपल्या घराकडे परतत असताना विक्रोळीनजीक दोन दुचाकीस्वारांचा अपघात झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावेळी त्यांनी तत्काळ गाडी थांबवून या अपघातग्रस्त नागरिकांची चौकशी करून त्यांना मदतीचा हात दिला.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी आपला ताफा थांबवून या अपघातग्रस्त तरुणाची आणि एका मुस्लिम कुटुंबाची चौकशी केली. यात तरुण आणि मुस्लिम कुटुंबातील महिलेला दुखापत झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी तत्काळ आपल्या ताफ्यातील गाडी देऊन करून जवळच्या गोदरेज रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यास सांगितले.

तसेच सोबत आपला अधिकारी देखील मदतीसाठी दिला. रात्री उशिरा त्यांच्यावर उपचार केल्यानंतर आता दोघेही सुखरूप असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत.

एवढ्या अपरात्री स्वतः मुख्यमंत्र्यांनी आपला ताफा थांबवून मदत केल्याने या दोघांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे आभार मानले. मात्र, यानिमित्ताने त्यांच्यातील संवेदनशील स्वभावाचा पुन्हा नव्याने अनुभव आला.