भारतीय खाद्यपदार्थामध्ये सामान्यत दोनच गोष्टी जवळजवळ दररोज वापरल्या जातात, ते म्हणजे गहू आणि तांदूळ. आपल्या ताटात प्रामुख्याने गरम रोट्या आणि भात असतात. काहींना रोट्या खायला आवडतात, तर काहींना भात खाण्याची सवय असते. भात खाल्ल्याशिवाय अनेकांनी जेवण केल्यासारखं वाटतच नाही. पण भात जास्त प्रमाणात खाणे चांगले नाही. तुम्ही दररोज भात खात असाल तर तुम्हाला त्याचे दुष्परिणाम माहित असणे आवश्यक आहे.
मधुमेहाचा धोका वाढू शकतो
मधुमेह असलेल्या रुग्णांना भात कमी प्रमाणात खाण्याचा सल्ला दिला जातो. अनेकांना तर भात न खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण भाताचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त असतो. भात खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी पटकन वाढते. त्यामुळे फक्त मधुमेहाच्या रुग्णांनीच नाही तर सर्वांनीच अधिक प्रमाणात भात खाणे टाळले पाहिजे.
लठ्ठपणा वाढण्याची शक्यता
भातामध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण खूप अधिक असते. अशा परिस्थितीत तुम्ही जर रोज भरपूर भात खात असाल तर त्यामुळे तुमच्या शरीरातील चरबी आणि लठ्ठपणा वाढू शकतो. भात खाल्ल्यानंतर पटकन भूक लागते. त्यामुळे देखील तुम्हाला जास्त खाण्याची सवय लागते. अशा परिस्थितीत जर तुम्हाला तुमचे वजन नियंत्रणात ठेवायचे असेल किंवा वजन कमी करायचे असेल तर तुम्ही भात खाणे टाळले पाहिजे.
हृदयाशी संबंधित आजारांचा धोका
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, तुम्ही जर दररोज भात खात असाल तर तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी ते धोकादायक ठरू शकते. पांढऱ्या तांदळात कोणतेही पोषक तत्व नसतात. यात फायबरचे प्रमाणही कमी असते. तुम्ही जर रोज त्याचा आहारात समावेश केला तर ट्रायग्लिसराइडची पातळी आणि खराब कोलेस्ट्रॉलची पातळी झपाट्याने वाढते. यामुळे हृदयाशी संबंधित समस्या वाढू शकतात. तुम्ही जर भात खाण्याचे शौकीन असाल तर तुम्ही तपकिरी किंवा लाल तांदूळ याचा आहारात समावेश करु शकता.
चयापचय प्रभावित होऊ शकते
अनेक अभ्यासातून असे समोर आलंय की जे रोज भात खातात त्यांना मेटाबॉलिक सिंड्रोमचा धोका वाढू शकतो. भाताने चयापचय हळूहळू मंदावतो ज्यामुळे लठ्ठपणा आणि पचनाच्या अनेक समस्या उद्भवतात. दररोज भात खाण्याऐवजी कमी प्रमाणात त्याचे सेवन करावे. नेहमीच्या पांढऱ्या तांदळाऐवजी फायबरयुक्त तपकिरी तांदूळ तुम्ही खाऊ शकता.
कोलेस्टेरॉल वाढण्याचा धोका
भात खाल्ल्याने कोलेस्टेरॉलची पातळी वाढते हे अभ्यासातून सिद्ध झाले नसले तरी दररोज भात खाल्ल्याने शरीरात काही बदल नक्कीच होतात. शरीरात ट्रायग्लिसराइड आणि खराब कोलेस्ट्रॉलची पातळी यामुळे वाढू शकते. जर तुम्हाला आधीच उच्च कोलेस्ट्रॉलची समस्या असेल तर तुम्ही भात खाण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.