‘आधी म्हणाले सानप यांनी पिस्तूल ठेवलं आता…, बोलताना पापामामा होतोय’, सदावर्तेंच्या निशाण्यावर पुन्हा धस

बीड जिल्ह्यातल्या मस्सजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली, या घटनेनं राज्यभरात खळबळ उडाली. बीड जिल्ह्यासह राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. दरम्यान या प्रकरणात सुरुवातीपासूनच भाजप आमदार सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणात बोलताना त्यांनी काही पोलीस अधिकाऱ्यांवर देखील आरोप केले होते. सुरेश धस यांच्या आरोपांनी खळबळ उडाली होती.

करुणा शर्मा यांच्या गाडीत पोलीस अधिकाऱ्याने पिस्तुल ठेवल्याचा आरोप धस यांनी केला होता. तसेच पोलीस कर्मचारी भास्कर केंद्र यांच्यावर देखील त्यांनी गंभीर आरोप केले होते. भास्कर केंद्रे यांच्याकडे 15 जेसीबी, 100 टीप्पर आहेत, तसेच त्यांची मटक्यावाल्यासोबत भागेदारी आहे असं सुरेश धस यांनी म्हटलं होतं. सुरेश धस यांच्या या आरोपांना आता ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी धस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

नेमकं काय म्हणाले सदावर्ते?  

धस यांनी जे सांगितलं की सानप साहेब यांनी पिस्तूल ठेवलं, तसा आरोप त्यांनी केला होता. मात्र आता सुरेश धस यांनी पलटी मारली आहे, आधी म्हणाले पिस्तूल ठेवली आणि आता दुसरंच म्हणत आहेत. आता बोलताना पापामामा होतोय. मागासवर्गीयांना वेठीस धरलं जात आहे, असा हल्लाबोल सदावर्ते यांनी केला आहे. आता सुरेश धस गुणरत्न सदावर्ते यांच्या टीकेला काय प्रत्युत्तर देणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान दुसरीकडे आज बोलताना धनंजय मुंडे यांनी मला वाल्मिक कराडची ओळख करून दिली असं मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. यावरून  सदावर्ते यांनी जरांगे पाटील यांना देखील टोला लगावला आहे. आज जरांगे यांनी सांगितलं, की वाल्मीक कराडची भेट झाली, या भेटीत काय झालं हे त्यांनी सांगावं असं सदावर्ते यांनी म्हटलं आहे.

भटक्या विमुक्त वंचितांसाठी मी त्यांचा आवाज आहे, म्हणून लोक मला बोलत आहेत. एका उमरखेडच्या तरुणाचा मला फोन आला. जरांगेंमुळे कसं नुकसान झालं हे त्याने मला सांगितलं, असंही यावेळी सदावर्ते यांनी म्हटलं आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)