मोठी बातमी समोर येत आहे. मुंबईसह राज्यभरात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे. याचा मोठा फटका हा मुंबई शहराला बसला आहे. मंगळवारी मुंबईसह उपनगरांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. तर आज देखील मुसळधार पाऊस सुरू आहे. या अवकळी पावसाचा मोठा फटका हा चाकरमान्यांना बसल्याचं पाहायला मिळत आहे. पावसामुळे लोकल ट्रेनला विलंब झाल्यामुळे ऑफिसला निघालेल्या आणि ऑफिसवरून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.
लोकल सेवेला फटका
लोकल ट्रेन ही मुंबईची लाईफलाईन मानली जाते. याच लाईफलाईनला आता पावसाचा मोठा फटका बसल्याचं दिसून येत आहे. गेल्या एका तासापासून मुंबईच्या उपनगर आणि शहर भागात सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे मुंबईची लोकल सेवा विलंबाने सुरू आहे. पश्चिम रेल्वेवरची वाहतूक ही 5 ते 10 मिनिटांनी उशिरा सुरू आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पश्चिम रेल्वेच्या ओव्हरहेड वायरवर कापडाचा तुकडा आणि झाडच्या फांद्या पडल्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक ही काही वेळेकरता बंद झाली होती. मात्र झाडाच्या फांद्या हटवण्यात आल्यानंतर रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा सुरळीत सुरू झाली आहे.
वादळी वाऱ्यासह पाऊस
मुंबईमध्ये वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली आहे, अचानक आलेल्या या पावसामुळे चाकरमान्यांची चांगलीच तारंबळ उडाली. अनेकजण छत्री न घेता तसेच घराबाहेर पडले होते. त्यामुळे पावसात भिजण्याची वेळ त्यांच्यावर आली. तर दुसरीकडे पावसामुळे लोकलचा देखील खोळंबा झाला. लोकल ट्रेन लेट झाल्यामुळे त्याचा मोठा फटका हा नोकरदार वर्गाला बसल्याचं दिसून आलं.
विरार -वसईमध्ये सोसाट्याचा वारा
दरम्यान दुसरीकडे मंगळवारी रात्री विरार आणि वसईमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली. या वाऱ्यामुळे मोठं नुकसान झालं आहे, अनेक ठिकाणी झाडाच्या फांद्या तुटल्या, बऱ्याच वेळ वीज पुरवठा देखील खंडित झाला होता. ऐन रात्री वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांना याचा मोठा फटका बसला, बागांचं देखील मोठं नुकसान झालं आहे.