‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’, असं म्हटल्यास काही चुकीच ठरणार नाही. मुंबईला लागून असलेल्या शेजारच्या ठाणे जिल्ह्यात भाषिक वादासह मराठी विरुद्ध अमराठी अशा वादाच्या घटना वाढू लागल्या आहेत. कालच कल्याणमध्ये एका मराठी तरुणाला परप्रांतीय रिक्षा चालकांनी मारहाण केल्याच प्रकरण समोर आलं होतं. या तरुणाने व्हिडिओ रेकॉर्ड करुन मनातील संताप बोलून दाखवला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता कल्याण शेजारच्या डोंबिवलीमध्ये मराठी विरुद्ध अमराठी वाद समोर आला आहे. सत्यनारायण पूजा आणि हळदी कुंकू समारंभावरुन हा वाद झाला. पूजा आणि हळदी कुंकू समारंभाला सोसायटीतील अमराठी लोकांनी विरोध केला. पूजा आणि हळदी कुंकू समारंभासंदर्भात अपशब्द वापरल्याचा आरोप होत आहे.
डोंबिवलीच्या या सोसायटीत पूजा आणि हळदी कुंकू समारंभावरुन शिवीगाळ केल्याचा आरोप होत आहे. मराठी-अमराठी आपापसात भिडले असून हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहचलं आहे. मानपाडा पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार नोंदवण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी कल्याणमध्ये एका मराठी तरुणाने रेल्वे स्टेशन परिसराची दुरावस्था मांडली होती. यावेळी परप्रांतीय रिक्षा चालकांनी त्याच्यावर हात उचलला होता.
एकपण लेडीज वरुन जायला मागत नाही
“माणूस रोज थकून-भागून येतो. एकतरी सुविधा चांगली आहे का इथे?. एरिया बघा, सगळे परप्रांतीय रिक्षा चालक भरले आहेत. वरती वेश्या व्यवसाय चालू आहे. एकपण लेडीज वरुन जायला मागत नाही, कारण तिथे वेश्या व्यवसाय चालतो. कोणी यावर बोलायला मागत नाही. इथून यायचं, तर रिक्षावाल्यांची गर्दी. आज माझ्यावर काठीने हात उचलला. मी विरोध करायला गेलो, तर 10 रिक्षावाले माझ्या अंगावर आले” अशा शब्दात या तरुणाने मनातील खदखद व्यक्त केली होती.
‘तुम्ही मराठी लोक भिकारडे आहात’
त्याआधी मागच्या महिन्यात डिसेंबरमध्येच कल्याणमध्येच एका उच्चभ्रू सोसायटीत मराठी कुटुंबाला मारहाण झाल्याची घटना घडली होती. एका अमराठी महिलेने तुम्ही मराठी लोक भिकारडे आहात. चिकन मटन खावून घाण करणारे आहात, असे संतापजनक शब्द वापरले होते.