दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? प्रफुल्ल पटेल यांचे सूचक विधान, म्हणाले याची चर्चा…

Praful Patel : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रिकरणाची चर्चा चालू आहे. विशेष म्हणजे दोन्ही पक्ष एकत्र आले तर आम्हाला आनंदच आहे, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया दोन्ही राष्ट्रवादींच्या महत्त्वाच्या अनेक नेत्यांनी दिलेल्या आहेत. असे असतानाच आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे मोठे नेते प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणावर सूचक विधान केलं आहे. त्यांच्या विधानाचे आता अनेक अर्थ लावले जात आहेत.

असे महत्त्वाचे निर्णय हे…

प्रफुल्ल पटेल हे गोंदियाच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांना पत्रकारांनी अनेक प्रश्न विचारले. याच वेळी पटेल यांना दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाविषयी विचारणा करण्यात आली. याविषयी बोलताना प्रफुल्ल पटेल यांनी सूचक प्रतिक्रिया दिली. “असे महत्त्वाचे निर्णय हे प्रेससमोर घ्यायचे नसतात” असं चूक विधान प्रफुल्ल पटेल यांनी केलं. तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, देशामध्ये सध्या महत्त्वाच्या विषय सुरू आहे. पाकिस्तान आणि भारतामध्ये तणावाची स्थिती आहे. अशा वेळेस आम्ही राष्ट्रवादी एकत्रित करण्याच्या मुद्द्यावर चर्चा करणे योग्य होणार नाही. हा मुद्दा महत्त्वाचा नसून सध्या देशहितासाठी देशात एकत्र येणं आम्हाला महत्त्वाचं आहे, अशाही भावना प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केल्या.

संजय राऊतांना प्रफुल्ल पटेल यांचा टोला

पाकिस्तानसोबतच्या युद्धामध्ये माघार का घेतली? असा सवाल संजय राऊत यांनी केला होता. यावर प्रफुल पटेल यांना विचारले असता, ज्यांना स्वतःला आंतरराष्ट्रीय राजकारण काय आहे हे माहीत नाही. देशाचं भलं कशामध्ये आहे, ज्यांना माहिती नसेल अशा चिल्लर लोकांबद्दल आणि चिल्लर राजकारण करणाऱ्यांबद्दल उत्तर देणं मला योग्य वाटत नाही, असा टोला प्रफुल पटेल यांनी राऊतांना लगावला.

दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र येण्याचे आवाहन केले जाते. पवार घराण्यातील रोहित पवार यांनी तर दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र येण्यावर विचार करावा, असे एक्स समाजमाध्यमाद्वारे जाहीरपणे बोलून दाखवलेले आहे. तर खासदार सुप्रिया सुळे यादेखील या एकत्रिकरणावर सकारात्मक आहेत. अजित पवार यांच्या पक्षातील काही नेत्यांनीही शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले तर आम्हाला आनंद होईल, असे सांगितेलेल आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)