राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना अर्धांगवायूचा झटका आल्याचं सांगितलं जात होतं. तसेच त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याचं आवाहनही केलं जात होतं. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या समर्थकांमध्ये चलबिचल निर्माण झाली होती. मात्र, धनंजय मुंडे यांनी स्वत:च आपल्या आजारपणाची माहिती दिली आहे. आपल्याला अर्धांगवायूचा झटका आला नसल्याचं मुंडे यांनी स्पष्ट केलं आहे. मुंडे यांनी एक ट्विट करून ही माहिती दिली आहे.
आमचे सहकारी, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी केलेल्या एका विधानावरून मला अर्धांगवायू झाल्याचे वृत्त काही वाहिन्यांवर प्रसारित केले जात आहे. मुळात मला बेल्स पाल्सी हा आजार दीड महिन्यांपूर्वी झालेला असून त्याचा परिणाम चेहऱ्यावर झाल्याने अजूनही मला बोलायला त्रास होतो, असं माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.
नव्याने कोणताही आजार नाही
बाबासाहेब पाटील यांची आणि माझी दोन दिवसांपूर्वी एका बैठकीत भेट झाली होती. त्यांनी माझ्याबद्दल काळजी व्यक्त केली त्याबद्दल आभार. मात्र मला झालेला आजार हा अर्धांगवायू नसून बेल्स पाल्सी आहे आणि त्याचा तसेच इतर काही वैद्यकीय बाबींचा त्रास अजूनही होतो असून बोलायला त्रास आहे. मात्र नव्याने मला कोणताही आजार झालेला नाही, असं धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केलं होतं.
आमचे सहकारी, सहकारमंत्री श्री बाबासाहेब पाटील यांनी केलेल्या एका विधानावरून मला अर्धांगवायू झाल्याचे वृत्त काही वाहिन्यांवर प्रसारित केले जात आहे. मुळात मला बेल्स पाल्सी हा आजार दीड महिन्यांपूर्वी झालेला असून त्याचा परिणाम चेहऱ्यावर झाल्याने अजूनही मला बोलायला त्रास होतो.
श्री…
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) April 18, 2025
नामदेव शास्त्री काय म्हणाले?
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी शिरूर कासार तालुक्यातील पिंपळनेर येथे संत श्री भगवानबाबा यांच्या परंपरेतील नारळी सप्ताहानिमित्ताने एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला धनंजय मुंडे येऊ शकले नाही. यावेळी महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांच्या तब्येतीबाबत चिंता व्यक्त केली होती. धनंजय मुंडे यांच्या गालावरून वारं गेलं आहे. त्यांना बोलता येत नाही. त्यांची वाणी गेली आहे. त्यांच्यासाठी प्रार्थना करा, असं आवाहन नामदेव शास्त्री यांनी केलं होतं. त्यामुळे मुंडे यांना अर्धांगवायूचा झटका आल्याची जोरदार चर्चा महाराष्ट्रात होती. तसेच त्यांच्या तब्येतीबाबत त्यांचे समर्थक चिंताही व्यक्त करत होते. मात्र, धनंजय मुंडे यांनी स्वत: ट्विट करून या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.