धनंजय मुंडेंकडे 11 मोबाईल नंबर, त्यात…करुणा शर्मांकडून मोठा गौप्यस्फोट, नेमकं काय सांगितलं?

Karuna Sharma : गेल्या काही दिवसापांसून करुणा शर्मा वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. त्यांनी याआधी माजी मंत्री यांच्यावर अनेक अरोप केले आहेत. त्यानंतर आता आवादा कंपनीची बैठक धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी झाली होती. त्यामुळे याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी करुणा शर्मा यांनी केली आहे. तसेच धनंजय मुंडे यांच्याकडे एकूण 11 मोबाईल क्रमांक आहेत. या मोबाईल क्रमांकाचा सीडीआर तपासला तर संपूर्ण कच्चाचिठ्ठा समोर येईल, असा गौप्यस्फोट करुणा शर्मा यांनी केला आहे. शर्मा यांच्या खळबळजनक दाव्यानंतर आता वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

मुंडे यांच्याच बंगल्यावर आवादा कंपनीची बैठक

“मी कधीही माझ्या नवऱ्याची किंवा स्वत:च्या मुलाचीही पाठराखण कधीच करणार नाही. धनंजय मुंडे हे दोषी आहेत, असं मी कधीही म्हणालेली नाहीये. ते कदाचित दोषी ठरू शकतात. कारण त्यांच्या बंगल्यावरच आवादा कंपनीची बैठक झाली होती. तुम्ही याची सखोल चौकशी करावी,” अशी मागणी करुणा शर्मा यांनी केली.

मोबाईल क्रमांकाचा सीडीआर काढावा

तसेच, धनंजय मुंडे यांचे एकूण 11 मोबाईल क्रमांक आहेत. हे सर्व मोबाईल क्रमांक माझ्याकडे आहेत. या मोबाईल क्रमांकाचा सीडीआर काढावा. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ते 11 नंबर हवे असतील तर मी त्यांना ते देऊ शकते, असेही करुणा शर्मा म्हणाल्या.

मुंडे यांच्या सर्व 11 नंबरची यादी देऊ शकते

“देवेंद्र फडणवीस यांनी आजपर्यंत त्यांना भेटण्यासाठी मला वेळ दिलेली नाही. मी त्यांची भेट घेणार होते. मात्र मी त्यांच्याकडे कितीवेळा वेळ मागणार? देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी मला भेटण्यासाठी वेळ द्यायला हवा होता. मी धनंजय मुंडे यांच्या सर्व 11 नंबरची यादी देऊ शकते. 2022 साली मी सीबीआयमध्येही या मोबाईल क्रमांकांची तक्रार दिली होती. या मोबाईल क्रमांकाचा सीडीआर काढा, अशी मी मागणी केली होती,” अशी माहितीही त्यांनी दिली.

ते माझ्याशीही त्या मोबाईल क्रमांकावरून…

या सर्व मोबाईल क्रमांकाचे व्हॉट्सअॅप तसेच सीडीआर काढावा. सर्व गोष्टींचा तपास करायला हवा. त्यानंतर संतोष देशमुख खून प्रकरणात धनंजय मुंडे दोषी निघाले तर त्यांनाही शिक्षा व्हायला हवी. धनंजय मुंडे यांचे सर्व काळे कारनामे हे 11 मोबाईल क्रमांकातून होतात. 11 मोबाईल क्रमांक सोबत ठेवणे हे छोटी बाब नाही. हे सर्व मोबाईल क्रमांक धनंजय मुंडे यांचे आहेत. मी त्यांची पत्नी आहे. त्यामुळे या मोबाईल क्रमांकांवरून ते कधीकधी माझ्याशीही बोलले आहेत, अशी काही गुपितंही करुणा शर्मा यांनी उघड केली.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)