अंधेरी पश्चिम मतदारसंघाचे भाजप आमदार अमित साटम यांनी युवकांसाठी लिहिलेल्या ‘उडान’ या पुस्तकाच्या प्रकाशनसोहळ्यात फडणवीस बोलत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी ‘एनएमआयएमएस’चे प्र-कुलगुरू डॉ. शरद म्हैसकर उपस्थित होते.
‘या पुस्तकातून युवा पिढीला दिशा देण्याचे काम होईल. अमित साटम आपल्या राजकीय प्रवासात जे अनुभव जगले आहेत, त्यातून त्यांना जे शिक्षण मिळाले, त्याची या पुस्तकात मांडणी केल्यामुळे हे पुस्तक वास्तववादी वाटते. राजकारणी म्हणून आक्रमक असलेले साटम कौटुंबिक बाबतीत शांत दिसतात. आमदार म्हणून एखाद्या विषयावर बोलताना खूप कमी लोकांना त्या विषयाची पूर्ण समज असते. त्यात साटम एक आहेत. ते पूर्ण संशोधन करून विषयाच्या खोलात जातात आणि प्रभावीपणे विषयाची मांडणी करतात,’ असे फडणवीस पुढे म्हणाले.
‘पालकांनी आपली स्वप्ने मुलांवर न लादता, संरक्षक कवच बनून मुलाचे रक्षण करून, त्यांची आवड हेच करिअर म्हणून निवडण्यास मदत करावी. माझा कॉर्पोरट क्षेत्रातील अनुभव ते जनसेवा आणि समाजसेवा या पुस्तकात टिपली आहे,’ अशी भूमिका साटम यांनी मांडली.
‘करिअरसाठी आवड महत्त्वाची’
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आवडीलाच करिअर बनवण्याचा सल्ला दिला. ‘स्वानुभवावर लिहिलेले करिअर निवडीबाबतचे एक व्यावहारिक पुस्तक आहे. करिअर म्हणजे केवळ परीक्षेत चांगले गुण आणि नोकरीत चांगला पगार असे नव्हे. केवळ यशस्वी होण्याला करिअर म्हणता येत नाही. जी आवड आहे, त्याला करिअर बनवणे यासारखे अन्य भाग्य नाही. समाजाचे अंधानुकरण करू नये,’ असेही डॉ. भागवत म्हणाले.