दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या मनमानीमुळे महिलेचा मृत्यू, देवेंद्र फडणवीसांनी घेतला मोठा निर्णय

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर  रुग्णालयावर गंभीर स्वरुपाचा आरोप करण्यात येत आहे. प्रसूतीसाठी आलेल्या महिलेच्या कुटुंबाकडे दहा लाख रुपयांची मागणी करण्यात आली, पैसे न भरल्यानं या महिलेला रुग्णालयात दाखल करून घेतलं नाही,  योग्यवेळी उपचार न मिळाल्यानं या महिलेचा मृत्यू झाला, असा आरोप रुग्णालयावर करण्यात येत आहे. या घटनेनंतर राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे, नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.  तनिषा सुशांत भिसे असं मृत्यू झालेल्या या महिलेचं नाव आहे. दरम्यान यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

नेमकं काय म्हणाले फडणवीस?

ही घटना अतिशय दुर्दैवी आहे, असवेंदनशिलतेचा परिचय या घटनेतून आपल्याला पाहायला मिळतो. खरं म्हणजे दीनानाथ मंगेशकर हे अतिशय रेप्युटेड अशा पद्धतीचं हॉस्पिटल आहे. स्वत: लता दीदींनी त्या ठिकाणी पुढाकार घेऊन आणि मंगेशकर कुटुंबीयांनी हे रुग्णालय उभं केलं. तिथल्या डॉक्टरांनी आणि कर्मचाऱ्यांनी अतिशय असंवेदनशिलतेनं प्रसुतीसाठी आलेल्या महिलेला त्या ठिकाणी दाखल करून घेण्यास नकार दिला. किंवा अधिकचे पैसे मागितले अशाप्रकारचा जो विषय आलेला आहे,

ही बातमी समोर आल्यानंतर लोकांमध्ये अतिशय चिड आहे. किमान धर्मादाय रुग्णालयांनी तरी आपली भूमिका योग्य पद्धतीनं निभावली पाहिजे, अशा प्रकारची आपल्या सर्वांची अपेक्षा आहे आणि म्हणूनच या संदर्भात मी एक हाय लेव्हल कमिटी तयार केलेली आहे. जी या घटनेचा तर तपास करेलच त्यासोबतच अशा प्रकारच्या घटना होऊ नयेत, म्हणून धर्मादाय रुग्णालयावर आपल्याला कशाप्रकारे नियंत्रण ठेवता येईल, विशेष: मेडिकल इथिक्स पैशांची चिंता न करता कशाप्रकारे आपल्याला त्यांना दाखल करून घेणं हे गरजेचं होतं. त्यामुळे इथिक्सचं पालन होतं की नाही यावर आपण लक्ष ठेवणार आहोत, आमचा मुख्यमंत्री कक्ष आहे, त्यांनी सुद्धा स्वत: या प्रकरणात लक्ष घातलं होतं, परंतु दुर्दैवानं योग्य प्रतिसाद हा त्या ठिकाणी रुग्णालयाकडून मिळालेला नाही. त्यामुळे पुढील काळात अशा घटना घडू नये, यासाठी अतिशय कडक कारवाई करण्यात येणार असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)