Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस शिंदेंच्या आमदारावर संतापले, थेट कारवाईचा इशारा; नेमकं काय घडलं?

Devendra Fadnavis : राज्यात सध्या महायुतीचे सरकार आहे. या महायुतीत एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष आणि भाजपा हे तीन पक्ष एकत्र आहेत. महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर यात तिन्ही पक्षांचे नेते अनेकदा एकमेकांसमोर आलेले आहेत. निधी मंजुरीच्या मुद्द्यावरून तर या तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये अनेकदा धुसफूस झालेली पाहायला मिळाली. दरम्यान, आता शिंदे यांच्या पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांच्या एका विधानाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त केलाय. विशेष म्हणजे त्यांनी संजय गायकवाड यांना भविष्यात अशी विधानं केली तर थेट कारवाई केली जाईल, अशी तंबीच दिली आहे.

ते असं बोलत असतील तर…

देवेंद्र फडणवीस हे माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. यावेळी बोलताना पत्रकारांनी त्यांना संजय गायकवाड यांनी केलेल्या विधानाबाबत विचारण्यात आलं. याचं उत्तर देताना, “मला वाटतं की पोलिसांबद्दल असं बोलणं योग्य नाही. मी स्वत: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना सांगणार आहे की, संजय गायकवाड यांना कडक समज द्यावी. हे असं चालणार नाही. हे योग्य नाही. वारंवार ते असं बोलत असतील तर त्यावर कारवाई केली जाईल,” अशी तंबीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय.

संजय गायकवाड नेमकं काय म्हणाले होते?

एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे नेते तथा आमदार संजय गायकवाड यांनी महाराष्ट्र पोलिसांवर बोलताना पातळी सोडून टीका केली आहे. “अरे महाराष्ट्र पोलिसांसारखं अकार्यक्षम खातं फक्त भारतातच नव्हे तर जगात कुठेही नाही. “शासाने पोलीस खात्याशी संबंधित कोणताही कायदा केला की, त्याचा एक हफ्ता वाढतो. सरकारने गुटखाबंदी केली की पोलिसांचा हफ्ता वाढतो. दारू बंद केली की ती चालू ठेवण्यासाठी पोलिसांचा हफ्ता वाढतो,” असा आरोपच संजय गायकवाड यांनी केला.

गायकवाड यांनी दिला पोलिसांना सल्ला

या राज्यातील पोलिसांनी प्रामाणिकपणे केलं की या जगातील सगळीच गुन्हेगारी शकते. यांनी फक्त सदरक्षणाय खलनिग्रहणाय या उक्तीप्रमाणे प्रामाणिकपणे काम करावं, असा सल्लाही त्यांनी महाराष्ट्र पोलिसांना दिला. त्यांच्या याच विधानाचा व्हिडीओ सगळीकडे व्हायरल होत आहे. त्यानंतर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या स्तरातून प्रतिक्रिया उमटल्या. काही त्यांच्या विधानाचं स्वागत केलं तर काहींनी टीका केली.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)