राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनात सध्या राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा सुरु आहे. यामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांकडून शाब्दिक वार प्रहार सुरु आहेत. यादरम्यान विधान परिषदेत विरोधी पक्षाने नोकरभरती, पेपरफुटी, अर्थव्यवस्था अशा महत्वाच्या प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधले. यावर देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांसमोर आपल्या कामांचा पाढा वाचला आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘या सरकारने पारदर्शीपणे नोकरभरती करून नोकरभरतीचा विक्रम केला आहे. सरकारने ७५ हजार पदं भरण्याची घोषणा केली होती. त्यातील ५७ हजार ४५२ लोकांना नियुक्तीचे आदेश दिले आहेत. १९,८५३ लोकांची परीक्षा आणि कागदपत्रांची पडताळणी झाली आहे. पुढच्या महिन्याभरात त्यांनाही नियुक्ती मिळणार आहे. अशाप्रकारे एकूण ७७ हजार ३०५ लोकांना नोकरी देण्यात आली आहे. हा कोणत्याही सरकारच्या काळ शोधला तर त्यातील हा मोठा रेकॉर्ड आहे.’ तर पुढच्या तीन महिन्यांच ३१ हजार २०१ लोकांना रोजगार दिला जाणार आहे, सरकारने दोन वर्षांत १ लाख लोकांना सरकारी नोकरी देण्याचा विक्रम केला आहे.
ते पुढे म्हणाले, सरकारने लाखों विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या. त्यातून ही सरकारी पदं भरली गेली. या सर्वांत पेपरफुटीची एकही घटना घडलेली नाही. गेल्या सरकारच्या काळातील पेपरफुटीची लिस्ट माझ्याकडे आहे. जलसंधारणाच्या परक्षेतील एका विद्यार्थ्याच्या अॅडमिट कार्डवर वेगळे नंबर होते. आम्ही पेपरफुटी समजून परीक्षा रद्द केली आणि त्याच्यावर एफआयआर झाली. याव्यरिक्त ४७ घटना घडल्या, त्या सर्वांमध्ये एफआयआर झाल्या. या एफआयआर पेपरफूटीच्या नसून विद्यार्थ्यांनी केलेल्या गैरप्रकाराच्या आहेत. पेपरफुटीची एकही एफआयआर नाही. मी अधिकृत माहिती सांगतो, तसं नसेल तर माझ्यावर हक्कभंग आणा.
‘पेपरफुटी झाली तर मग त्या जलसंधारण विभागाच्या परीक्षेतील विद्यार्थ्याचे फक्त ४८ उत्तर कशी बरोबर आहेत. ५० टक्के सुद्धा उत्तर बरोबर नाहीत.’ यावर विरोधी बाकावरुन आक्षेप घेताच फडणवीस विरोधकांना फटकारत म्हणाले, ‘वंजारी साहेब पेपरच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका. सरकारने पारदर्शकता ठेवून जवळपास ७० लाख तरुणांच्या परीक्षा घेतल्यात. मग विरोधकांकडून तयार करण्यात येणारा नॅरेटिव्ह चुकीचा आहे.’