Chopra bus stand in Jalgaon will be transformed, developed on the lines of a bus port
राज्यातील एसटी स्थानकांचा बीओटी ( बांधा वापरा आणि हस्तांतरित करा) तत्वावर विकास करण्यात येणार आहे. यासाठी लवकरच निविदा काढण्यात येणार आहेत. या निविदांमध्ये सुरुवातीला जळगावच्या चोपडा एसटी बसस्थानकाचा कायापालट होणार असून या स्थानकाचा बसपोर्टच्या धर्तीवर विकास करण्यात येणार आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग सावंतवाडी आणि अंबोली या बसस्थानकांचाही विकास करण्यात येणार असल्याची माहीती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. अलिकडे परिवहन मंत्र्यांनी गुजरात येथील बसस्थानकांच्या बसपोर्ट म्हणून झालेल्या विकासाची पाहणी केली होती त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
बसस्थानकांचे ‘बीओटी’वर अत्याधुनिकीकरण
राज्यातील सर्व एसटी बसस्थानकांना अत्याधुनिक करण्याचे धोरण यावेळी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सादर केले. राज्यातीस सर्व बसस्थानकांना बीओटी तत्वावर अत्याधुनिक केले जाणार आहे. शहर, तालुका आणि ग्रामीण भागातील एसटीच्या सेवेचा दर्जा सुधारण्याबरोबर ‘बांधा वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्वावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, दोडामार्ग आणि अंबोली या बसस्थानक विकास होणार आहे. आंबोली येथील बसस्थानक पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे असल्याने तेथे सर्व सुविधा युक्त नवीन बसस्थानक बांधण्यात यावे अशी मागणी यावेळी माजी मंत्री दिपक केसरकर यांनी केली. त्यास परिवहन मंत्र्यांनी तत्वत: मंजूरी दिली आहे
सिल्लोड बसस्थानकासाठी रस्ता बांधणार
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड बसस्थानकावर प्रवाशांसाठी रस्ता उपलब्ध करून देण्यात याव्यात अशी मागणी यावेळी माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केली. याबाबत लवकरच निर्णय घेऊन बसस्थानकात पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन परिवहन मंत्र्यांनी दिले.
चोपडा बसस्थानकात अत्याधुनिक बसपोर्ट
जळगाव जिल्ह्यातील चोपडा बसस्थानकाला बसपोर्टच्या धर्तीवर विकसित करावी अशी मागणी यावेळी स्थानिक आमदार चंद्रकांत सोनावणे यांनी केली. मध्यप्रदेश राज्याच्या सीमावर्ती भागामध्ये असलेला चोपडा हा आदिवासीबहुल तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यातील महत्वाचे बसस्थानक म्हणून चोपडा बसस्थानकाला अत्याधुनिक सोयी सुविधायुक्त बनविण्याची मागणी यावेळी सोनावणे यांनी केली. चोपडा बसस्थानकाच्या विकासासंदर्भात लवकरच निविदा प्रक्रिया राबवून बांधा वापरा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर हे बसस्थानक विकसित करण्याच्या सूचना मंत्री सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.