देवेन भारती यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्या मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त आहेत. विवेक फणसाळकरांच्या निवृत्तीनंतर देवेन भारती यांच्याकडे मुंबई पोलीस आयुक्तपद देण्यात आलं आहे. विवेक फळसाळकर हे आज 30 एप्रिल रोजी निवृत्त झाले. त्यांच्यानंतर आयुक्तपदासाठी सदानंद दाते, संजयकुमार वर्मा, रितेश कुमार, महिला पोलीस अधिकारी अर्चना त्यागी यांच्या नावाची चर्चा होती. याशिवाय देवेन भारती यांच्याकडेही या पदाची धुरा दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. विवेक फणसाळकर यांनी 30 जून 2022 मध्ये मुंबई पोलीस आयुक्तपदाची धुरा स्वीकारली होती. देवेन भारती हे 1994 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.
ते मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांचे निरीक्षण करणारे महत्त्वाचे कार्यालय असलेल्या संयुक्त पोलीस आयुक्तांपैकी एक होते. याशिवाय त्यांनी अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा), महाराष्ट्र राज्य दहशतवादी विरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख यांसारखी अनेक महत्त्वाची पदं भूषवली आहेत. 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यासह शहरात नोंदवलेल्या अनेक मोठ्या गुन्ह्यांच्या तपासात देवेन भारती सहभागी होते. 2014 ते 2019 दरम्यान देवेन भारती यांनी महत्त्वाच्या पदांवर काम केलं. परंतु ऑक्टोबर 2020 मध्ये महाविकास आघाडी सरकारने त्यांची महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळमध्ये (MSSC) बदली केली.
बातमी अपडेट होत आहे..