Dengue Cases: राज्यात डेंगीच्या रुग्णसंख्येत वाढ; सर्वाधिक रुग्ण ‘या’ जिल्ह्यात, काय सांगते आकडेवारी?

प्रतिनिधी, पुणे : पावसाचे आगमन झाल्यानंतर डेंगीने डोके वर काढले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा रुग्णसंख्येत दीडपट वाढ झाली असून, सर्वाधिक रुग्ण पालघर जिल्ह्यातील आहेत. पावसाळ्यात डेंगी, मलेरिया, चिकनगुनिया या आजारांमध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याने काळजी घेण्याचा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे.

राज्यात यंदा एक जानेवारी ते सात मे या कालावधीत डेंगीचे एक लाख २७ हजार १४० संशयित रुग्ण आढळले आहेत. गेल्या वर्षी याच कालावधीत ही संख्या ८१,७३१ होती. यंदा निदान झालेल्या रुग्णांची संख्या १,७५५ आहे. गेल्या वर्षी ही संख्या १,२३७ होती. राज्यात सर्वाधिक डेंग्यूचे रुग्ण (१७४) पालघर जिल्ह्यात आढळले आहेत. त्यापाठोपाठ कोल्हापूर जिल्हा (११७), अकोला जिल्हा (७१), नांदेड जिल्हा (५८) आणि सोलापूर जिल्ह्यात ५१ रुग्ण आढळले.

मुंबई महापालिकेत सर्वाधिक रुग्णसंख्या आढळली (२८५) आहे. त्यापाठोपाठ नाशिक महापालिका (७९), कोल्हापूर महापालिका (४५), सांगली महापालिका (४१) आणि पनवेल महापालिकेत ३८ अशी रुग्ण आढळले आहेत.

पुण्यात २९० संशयितांची नोंद

पुणे शहरात गेल्या तीन महिन्यांत डेंगीच्या २९० संशयित रुग्णांची नोंद झाली आहे. यातील १० रुग्णांचा तपासणी अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आला आहे. महापालिका आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना डासोत्पत्तीची ठिकाणे नष्ट करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. डासोत्पत्तीची ठिकाणे नष्ट न केल्यामुळे ३७० आस्थापनांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. यामध्ये सोसायट्या, व्यावसायिक इमारती आणि अन्य ठिकाणांचा समावेश आहे. नोटिसांतून ७३ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
Heat Stroke: यंदाचा उन्हाळा ठरला अतितापदायक! राज्यात उष्माघाताचे तब्बल ३३५ रुग्ण
राज्यात यंदा एक लाख ८८ हजार ८३४ संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली. आतापर्यंत एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. गेल्या वर्षी या कालावधीत एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. पूर्वीच्या तुलनेत आता तपासण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. त्यामुळे रुग्ण वाढल्याचे दिसून येत आहे. – डॉ. राधाकिशन पवार, सहसंचालक, आरोग्य विभाग

डेंगीचे वर्षनिहाय रुग्ण आणि मृत्यू
वर्ष रुग्ण मृत्यू
जानेवारी ते मे २०२३ १२३७ १
जानेवारी ते मे २०२४ १७५५ ०