काँग्रेसच्या दिग्गजांना पराभवाचा धक्का, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरातांसह इतर नेत्यांच्या हातून मतदारसंघ निसटला

भाजपाच्या त्सुनामीने राज्यात महाविकास आघाडी नेस्तनाबूत केली. एक्झिट पोलचे आकडे सुद्धा यावेळी महायुतीने गुंडाळून ठेवले. भाजपाच्या लाटेने ना भूतो न भविष्यती अशी कामगिरी केली. भाजपाच्या या महापूरात काँग्रेसचे दिग्गज नेते पराभूत झाले. ज्यांनी महाविकास आघाडीच्या बांधणीत आणि सुकाणू समितीत हिरारीने सहभाग घेतला ती मंडळी या विधानसभा निवडणुकीत धराशायी झाली. या विधानसभा निवडणुकीत भाजपाने 133 जागांवर आघाडी घेतली आहे. तर शिंदे सेना 56 आणि अजित पवार गटाला 40 जागांवर आघाडी मिळाली आहे.

राज्यातील 288 जागांसाठी सरासरी 65 टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले आहेत. लोकसभा निवडणुकीपेक्षा मतांचा टक्का वाढला. अनेक जण हे भाजप-राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या रणनीतीचा भाग मानत आहे. तर काही जण लाडक्या बहि‍णींचे वाढलेले मतदान मानत आहेत. पण यंदा भरघोस मतदान झाल्याने सर्व समीकरणं बदलली आहे. तर हिंदुत्वाचे खेळलेले कार्ड सर्वच मुद्दांवर भारी ठरल्याचे दिसून आले. भाजपाने मोठी झेप घेतली. एकट्या भाजपानेच महायुतीचा गाडा ओढल्याचे दिसून येते.

पृथ्वीराज चव्हाण यांना धक्का

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना राज्यात मोठा धक्का बसला. कराड दक्षिण मतदारसंघात त्यांचा पराभव झाला. एकूण 18 मतमोजणी फेऱ्यांमधील 15 फेऱ्यांमध्ये ते मागे फेकले गेले. य ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे डॉ. अतुलबाबा भोसले यांनी त्यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. भोसले यांना 1,14,2025 मतं मिळाली. तर पृथ्वीराजबाबांना 89,398 मते मिळाली.

बाळासाहेब थोरात यांचा पराभव

बाळासाहेब थोरात यांच्या नावावर निवडणुकीत अनेक रेकॉर्ड आहेत. संगमनेरमधून बाळासाहेब थोरात यापूर्वी आठ वेळा निवडून आले. पण नवव्या वेळी त्यांचा पराभवाचा सामना करावा लागला. काँग्रेससाठी हा सर्वात मोठा धक्का मानण्यात येत आहे. आघाडीची सत्ता आली असती तर ते काँग्रेस पक्षाकडून मुख्यमंत्री पदाचे प्रमुख दावेदार होते. त्यांच्या मतदारसंघात नुकताच मोठा राडा झाला होता.

धीरज देशमुख – धीरज देशमुख सध्या पराभवाच्या छायेत असल्याचा दावा करण्यात येत आहे. लातूर ग्रामीण  या मतदारसंघात सध्या काँटे की टक्कर सुरू आहे. काँग्रेसचे धीरज देशमुख यांना 66988 मते मिळाली आहेत. तर भाजपाचे रमेश कराड यांना 70,561 मतं मिळाली आहेत. मतमोजणीच्या 26 पैकी 17 फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत.

नाना पटोले – साकोली विधानसभा मतदारसंघात नानाभाऊ पटोले यांच्यासमोर मोठे आव्हान आहे. मतमोजणीच्या 28 फेऱ्यांपैकी 15 फेऱ्यांमध्ये पटोले यांना 535 मतांची आघाडी आहे. त्यांच्यासमोर भाजपाचे उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांनी मोठे आव्हान उभं केलं आहे. त्यांना 49,381 मत मिळाली आहेत.

विजय वडेट्टीवार – काँग्रेसचे दिग्गज नेते विजय वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदारसंघातून 4 हजारांच्या आघाडीवर आहेत. त्यांना 52,498 मतं मिळाली तर दुसरीकडे भाजपाचे क्रिशनलाल सहारे यांना 48,422 मतं मिळाली आहेत. मत मोजणीच्या 23 फेऱ्यांपैकी 11 फेऱ्यांमध्ये ही स्थिती आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)