तानाजी सावंतांची जिल्हा नियोजन बैठकीला दांडी, प्रताप सरनाईकांनी चांगलंच सुनावलं, म्हणाले राजकीय खुर्ची..

महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये यावेळी अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली त्यामुळे काही अनुभवी नेत्यांची संधी हुकली. त्यामुळे मंत्रिपदासाठी प्रबळ दावेदार असूनही मंत्रिपद न मिळालेले महायुतीमधील नेते नाराज असल्याची चर्चा आहे, यातील काही नेत्यांनी तर उघड -उघड आपली नाराजी व्यक्त केली होती. गेल्यावेळी शिवेसेनेचे नेते तानाजी सावंत यांच्याकडे आरोग्य मंत्रालय होतं, मात्र यावेळी त्यांना मंत्रिपद मिळालेलं नाही, त्यामुळे ते नाराज आहेत. त्यांनी आज झालेल्या पहिल्या जिल्हा नियोजन बैठकीला देखील दांडी मारली, यावर प्रतिक्रिया देताना धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी तानाजी सावंत यांना चांगलंच सुनावलं आहे.

नेमकं काय म्हणाले प्रताप सरनाईक? 

राजकीय खुर्ची फेविकॉल घेऊन उभी राहत नाही ती बदलत असते, आदलाबदल होत असते, अशी प्रतिक्रिया प्रताप सरनाईक यांनी तानाजी सावंत यांच्या नाराजीवर दिली आहे. प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या पहिल्या जिल्हा नियोजन बैठकीला तानाजी सावंत यांनी दांडी मारली, मात्र याबाबत त्यांच्याशी आपलं काहीही बोलणं झालं नसल्याचं देखील प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे.

जिल्हा नियोजन बैठकीत पालकमंत्री म्हणून प्रताप सरनाईक यांनी मोठा निर्णय घेतला आहे. तुळजापुरात मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. धाराशिव जिल्ह्यात आरोग्य विभागाकडे विशेष लक्ष देणार असल्याचंही यावेळी सरनाईक यांनी स्पष्ट केलं.  दरम्यान  माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या जिल्ह्यात पालकमंत्री प्रताप सरनाईकांनी पहिला निर्णय आरोग्य विभागाशी संबंधित घेतल्यानं या निर्णयाची जोरदार चर्चा सुरू आहे.

दरम्यान यावेळी शिवसेना ठाकरे गटातील काही नेते शिवसेनेत येऊ शकतात असा संकेत देखील सरनाईक यांनी दिले आहेत. पुढे पुढे बघा  काय होतंय, धाराशिव जिल्ह्यात बदल झाला तर विशेष वावगे वाटायला नको, असं सूचक वक्तव्य प्रताप सरनाईक यांनी केलं आहे. त्यामुळे आता धाराशिव जिल्ह्यातील कोणते नेते शिवसेनेच्या गळाला लागणार याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)