Cyber Fraud : शेअर मार्केट गुंतवणुकीचे आमिष चांगलेच भोवले, ‘या’ प्रकारे घातला लाखोंचा गंडा

प्रतिनिधी, पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने व्यावसायिकाची ४४ लाख ५७ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका व्यावसायिकाने मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.तक्रारदार व्यावसायिक कोंढवा-बिबवेवाडी रस्त्यावरील एका सोसायटीत राहतात. सायबर चोरट्यांनी व्यावसायिकाच्या मोबाइलवर तीन महिन्यांपूर्वी मेसेज पाठवून शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवले होते. त्यानंतर चोरट्यांनी त्यांना एक लिंक पाठवली. त्या लिंकमध्ये शेअर बाजारातील व्यवहारांची माहिती होती. व्यावसायिकाने त्या लिंकमध्ये स्वत:ची माहिती भरून दिली.

Nagpur News : शहरे खड्डेमुक्त करण्यासाठी पालिकेची मोहीम, रस्ते दुरुस्तीसाठी अत्याधुनिक मशिनचा वापर
सुरुवातील व्यावसायिकाने काही रक्कम गुंतवली; त्यानंतर चोरट्यांनी त्यांना गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळाल्याचा संदेश पाठवला. त्यानंतर व्यावसायिकाने वेळोवेळी पैसे पाठवले. गेल्या तीन महिन्यांत व्यावसायिकाने एकूण ४४ लाख ५७ हजार रुपये चोरट्यांच्या बँक खात्यात जमा केले. मात्र, चोरट्यांनी त्यांना परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर व्यावसायिकाने पोलिसांकडे तक्रार दिली.

पंधरा लाखांची फसवणूक

आभासी चलनात (क्रिप्टोकरन्सी) गुंतवणुकीच्या आमिषाने एका महिलेची १५ लाख १० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी संबंधित महिलेने चतु:शृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार महिला पाषाण-सूस रस्त्यावरील एका सोसायटीत राहतात. सायबर चोरट्यांनी महिलेला आभासी चलनात गुंतवणुकीचे आमिष दाखविणारा संदेश पाठवला होता. चोरट्यांनी महिलेला जाळ्यात ओढून वेळोवेळी १५ लाख १० हजार रुपये उकळले.