मुलुंडच्या अनमोल याने नोकरीच्या वेतनात भागात नसल्याने पार्टटाइम काम करण्याचे ठरवले. याचवेळी समाजमाध्यमांवर त्याने एक जाहिरात पाहिली. या जाहिरातीमधील लिंकवर क्लिक केले असता अनमोल टेलिग्रामच्या एका ग्रुपमध्ये सहभागी झाला. या ग्रुपमध्ये इतरही अनेक सदस्य होते आणि ते वेगवेगळ्या टास्कबाबत विचारणा करत होते आणि ते पूर्णही करत होते. घरबसल्या कमावण्याचे चांगले साधन असल्याने अनमोल याने टास्क पूर्ण करण्यास सुरुवात केली. ‘पेड टास्क’ पूर्ण केल्यास अधिक परतावा येत असल्याने अनमोलने सुमारे नऊ लाख ९२ हजारांची गुंतवणूक केली. वॉलेटमधील रक्कम काढता येत नसल्याचे पाहून आपली फसवणूक झाल्याचे अनमोलच्या लक्षात आले.
टेलिग्रामवर असताना मालवणी येथील तरुणाला अनिया नावाच्या प्रोफाइलवरून एक संदेश आला. यामध्ये पार्टटाइम नोकरी करण्यास इच्छुक आहात का अशी विचारणा करण्यात आली. कोणत्याही प्रयत्नाविना काम मिळत असल्याने या तरुणाने होकार दिला. मात्र उत्पन्न मिळवण्याच्या प्रयत्नात या तरुणाने नऊ लाख ९६ हजार रुपये गमावले.
आणखी काही घटना
– माटूंगा येथील गृहिणीने फावल्या वेळात टास्क पूर्ण करण्याच्या नादात सहा लाख २५ हजार रुपये गमावले
– कुर्ला येथील तरुणाला आधी गुगल रिव्ह्यू आणि नंतर आभासी चलनात गुंतवणुकीच्या नावाखाली साडेचार लाखांना फसवले
– एक चॅनल सबस्क्राइब केल्यास १५० रुपये मिळणार असे भासवून वांद्र्याच्या तरुणाला साडेपाच लाखांचा गंडा
– चेंबूर टिळ्कनगरच्या महिला फॅशन डिझायनर ने दोन लाख ६२ हजार रुपये गमावले.
– हॉटेल्सच्या रिव्ह्यू देऊन पैसे कमवण्याच्या बहाण्याने वांद्रे येथील तरुणाची सात लाखांची फसवणूक
हे लक्षात असू द्या
– घरबसल्या हजारो, लाखोचे उत्त्पन्न कुणी देणे शक्य नाही
– अनोळखी क्रमांकावरील संदेशला प्रतिसाद देऊ नका
– संदेशातील लिंकवर क्लिक किंवा क्रमांकावर संपर्क साधू नका
– समाजमाध्यमांवरील आकर्षक जाहिरातींना भुलू नका
– ॲनी डेस्क, क्विक सपोर्ट, टीम व्ह्यूअर ॲप डाउनलोड करू नये
– कोणत्याही लिंकवर, ग्रुपमध्ये बँक खात्याचा तपशील देऊ नका
– पेड टास्कसाठी स्वतःकडील पैसे गुंतवू नका
– फसवणूक झाल्यास १९३० या हेल्पलाइनवर संपर्क करा
– जवळच्या पोलिस ठाण्यात किंवा सायबर पोलिसांकडे तक्रार करा