शेअर बाजारात गुंतवणुकीबाबत यामध्ये सतत चर्चा सुरू असायची. तसेच अनेकजण आपल्याला झालेला फायदा यामध्ये सांगत असल्याने सल्लागाराला सर्व खरे वाटले. थोडे थोडे करून त्याने तब्बल दोन कोटी रुपये गुंतवले. त्याच्या वॉलेटमध्ये दोन कोटींचे १४ कोटी झाल्याचे दिसत होते. त्याने यातील रक्कम काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तो यशस्वी झाला नाही. सल्लागाराने याबाबत गायत्री देवीशी संपर्क साधला असता तिच्याकडून काहीच प्रतिसाद मिळत नव्हता.
दोन कोटी रुपये बुडाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने मध्य विभाग सायबर पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी मोबाइल क्रमांक, फसवणुकीसाठी वापरण्यात बँक खाती, तसेच इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू केला. तपासादरम्यान आसाम, झारखंड, तमिळनाडू आणि झारखंड या राज्यांत फसवणुकीचे पैसे काढण्यात आल्याचे आणि त्यातील एक बँक खाते घाटकोपर येथील एका व्यक्तीचे असल्याचे दिसून आले.
त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याने एका ठिकाणी पार्ट टाइम नोकरीसाठी अर्ज केला होता. निवड झाल्यानंतर त्याच्या नावाने बँक खाते उघडण्यात आले आणि त्याचा वापर सायबर फसवणुकीसाठी केल्याचे उघड झाले. विशेष म्हणजे सायबरचोरांनी काही रक्कम या तरुणाला दिल्याचे तपासातून समोर आले. या गुन्ह्यातील मुख्य आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.