Cyber Crime : गुगलची मदत घेणे पडले महागात, सायबर चोरट्यांकडून लाखोंची फसवणूक, नेमके प्रकरण काय?

प्रतिनिधी, मुंबई : पवई येथील व्यक्तीला आपल्या पुतण्याला उपचारासाठी कूपर रुग्णालयात न्यायाचे होते. डॉक्टरांची वेळ मिळविण्यासाठी त्यांनी गूगलवर कूपर रुग्णालयाचा संपर्क क्रमांक मिळवला. यावर मात्र या नंबरमुळे सायबरचोरांनी त्यांच्या मोबाइलचा ताबा घेत परस्पर सुमारे पाच लाख रुपये काढून घेतले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर या व्यक्तीने पवई पोलिस ठाण्यात तक्रार केली.पवई परिसरात सुतारकाम करणाऱ्या राघव (बदललेले नाव) यांना पुतण्याला डॉक्टरकडे न्यायचे होते. हे डॉक्टर कूपर रुग्णालयात बसत असल्याने राघव यांनी गुगल सर्च इंजिनवर जाऊन या रुग्णालयाचा क्रमांक मिळवला. इंटरनेटवर मिळलेल्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला असता समोरील व्यक्तीने कूपर रुग्णालयाचा प्रतिनिधी बोलत असल्याचे सांगितले. डॉक्टरना भेटण्यासाठी ऑनलाइन नोंदणी करावी लागेल, असे सांगून या व्यक्तीने एक लिंक पाठवली.

Mumbai Crime : धक्कादायक बातमी! भंगार साहित्य चोरीच्या वादातून मित्रानेच घोटला मित्राचा गळा

या लिंकवर क्लिक केल्यास रुग्णालयाचा कस्टमर सपोर्ट ॲप डाउनलोड होईल. त्यावर वैयक्तिक तपशील भरून नोंदणी करा, असे सांगितले. राघव यांनी हा ॲप डाउनलोड केला मात्र त्यांना संशय आल्याने पुढील कोणतेही व्यवहार केले नाहीत. या ॲपमुळे समोरील व्यक्तीने त्यांच्या मोबाइलचा ताबा घेतला आहे हे राघव यांना कळलेच नाही.

काही दिवसांनंतर राघव यांनी आपल्या खात्याचा दोन लाखांचा चेक एका व्यावसायिकाला दिला. पुरेशी रक्कम नसल्याने हा चेक बाउन्स झाला. राघव यांनी बँकेत जाऊन चौकशी केली असता त्यांच्या खात्यामधून आठ ते दहा व्यवहार करून सुमारे पाच लाख रुपये इतर खात्यांमध्ये वळविण्यात आल्याचे त्यांना सांगण्यात आले.

कस्टमर सपोर्ट ॲपमुळे हे झाल्याचे लक्षात येताच त्यांनी त्वरित हे ॲप डिलीट केले. सायबर फसवणूक झाल्याप्रकरणी पवई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मोबाइल क्रमांक, बँक खाती आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.