Covid Subvariant: राज्यात करोनाचा नवा व्हेरिएंट, आतापर्यंत ९१ जणांना संसर्ग, ‘या’ जिल्ह्यांत आढळले रुग्ण

मुंबई : राज्यात करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे, मात्र ओमायक्रॉन विषाणूच्या केपी.२ या उपप्रकाराच्या ९१ रुग्णांची नोंद राज्यात झाली आहे. पुणे येथे ५१, तर ठाणे येथे दोघांना या विषाणूचा संसर्ग झाल्याची नोंद झाली आहे. जानेवारी महिन्यामध्ये या उपप्रकाराचा रुग्ण महाराष्ट्रात आढळून आला होता. संसर्गक्षमता असली, तरीही या प्रादुर्भावामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. हा उपप्रकाराचा मुंबईत एकही रुग्ण नाही.

मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये नोंद झालेल्या करोना रुग्णांमध्ये या उपप्रकारामुळे संसर्ग झाल्याचे दिसून आले आहे. मात्र त्यामुळे रुग्णालयामध्ये दाखल कराव्या लागणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली नाही. राज्याच्या जिनोम निर्धारण समन्वय समितीचे समन्वयक डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी जेएन.१ पासून या उपप्रकाराची उत्पत्ती झाल्याचे सांगितले. मार्च महिन्यामध्ये राज्यात रुग्णसंख्येत किंचित वाढ दिसून आली होती. या महिन्यात २५० करोना रुग्णांची नोंद झाली आहे.
heatstroke: सावधान! राज्यात उष्माघाताचे रुग्ण २०० पार, ‘या’ जिल्ह्यांत सर्वाधिक रुग्णांची नोंद
पुणे आणि ठाणे वगळता अमरावती आणि औरंगाबाद येथे या उपप्रकाराच्या सात रुग्णांची नोंद झाली आहे. सोलापूर येथे दोन, तर अहमदनगर, नाशिक, लातूर आणि सांगली येथे प्रत्येकी एका रुग्णसंख्येची नोंद झाली. मुंबईमध्ये मात्र या उपप्रकाराच एकही रुग्ण अद्याप आढळून आलेला नाही.

करोना हा आरएनए प्रकारचा विषाणू आहे. त्यात नैसर्गिकरित्या काही वर्षांनी जनुकीय बदल घडत असतात. मात्र लसीकरण किंवा आधी होऊन गेलेला करोना संसर्ग यामुळे या विषाणूंविरोधात चांगली प्रतिकारशक्ती निर्माण झाली आहे. त्यावर मात करण्यासाठी या विषाणूमध्ये असे जनुकीय बदल होतात. त्यामुळे नवीन विषाणू अधिक सक्षम बनण्याचा प्रयत्न करतो. ज्येष्ठ व प्रतिकारशक्ती खूपच कमी असलेल्या व्यक्तींना याचा संसर्ग होण्याची शक्यता असू शकते, याकडे नायर रुग्णालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे निवृत्त प्राध्यापक डॉ. माधव साठे यांनी लक्ष वेधले.