Courier Scam Alert: ऑनलाइन शॉपिंग करताय? सावधान, एक चूक अन् अशी फसवणूक तुमच्यासोबतही होऊ शकते
प्रतिनिधी, पिंपरी : तुमच्‍या पार्सलमध्‍ये अमली पदार्थ सापडले आहे. तुमच्‍यावर गुन्‍हा दाखल करतो, अशी भीती दाखवत एका महिलेची नऊ लाख ८२ हजार १०६ रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना पिंपळे सौदागर येथे २५ जुलै २०२३ रोजी ऑनलाइन पद्धतीने घडली.काय आहे प्रकरण?

या प्रकरणी २९ वर्षीय महिलेने मंगळवारी (२३ जुलै) सांगवी पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी ध्रुव (संपूर्ण नाव, पत्‍ता माहिती नाही), अजयकुमार बन्सल, डी. एस. स्वामी आणि ‘आयसीआयसीआय बँके’चा खातेधारक यांच्‍याविरोधात गुन्‍हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेला आरोपी ध्रुवने एका मोबाइल क्रमांकावरून फोन करून फेडेक्स पार्सल ऑफिसमधून बोलत असल्‍याचे सांगितले. ‘तुमच्‍या पार्सलमध्ये पाच किलो कपडे, सहा इंटरनॅशनल पासपोर्ट, चार एसबीआय क्रेडिट कार्ड, ९५० ग्रॅम एमडी हा अमली पदार्थ आहे,’ असे सांगितले. पुढील तपासाच्‍या नावाखाली मुंबई सायबर क्राइम विभागाशी कॉल जोडून दिला. व्हिडिओ कॉलवरून फिर्यादीसोबत अजयकुमार बन्सल याने चौकशी करून त्यांनतर फेडेक्स पार्सल प्रकरणाबाबत ‘मुंबई सायबर क्राइम’चे डी. एस. स्वामी यांनी फिर्यादीकडे खात्याबाबत चौकशी केली. फिर्यादीसोबत मोठ्या आवाजात बोलून गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवली आणि ‘आयसीआयसीआय बँके’त वैयक्तिक कर्ज काढण्यास भाग पाडले. त्यानंतर फिर्यादी महिलेने बँकेचा खाते क्रमांक देऊन त्यावर नऊ लाख ८२ हजार १०६ रुपये पाठवायला लावून फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली.

दुसरी घटना : नोकरीच्या आमिषाने तरुणाची फसवणूक

पुणे : लष्करात नोकरी लावण्याच्या आमिषाने तरुणाची फसवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीवर बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. लष्करी गुप्तचर यंत्रणेकडून (मिलिटरी इंटलिजन्स) ही कारवाई करण्यात आली. शत्रुघ्न तिवारी (वय २६, रा. गणेशकृपा चाळ, कल्याण) असे गु्न्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. तिवारी हा लष्करात जवान होता. तो लष्करी सेवा अर्धवट सोडून पसार झाला होता. या प्रकरणी एका तरुणाने (रा. नरवीर तानाजी मालुसरे रस्ता) बंडगार्डन पोलिस ठाण्यात तक्रार दिली.