संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करणारा तो खरच मनोरुग्ण का? कारस्थानाची थिअरी, फडणवीस काय म्हणाले?

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या परभणीतील पूर्णाकृती पुतळ्यासमोर संविधानाची जी प्रतिकात्मक प्रत आहे, त्याची 10 डिसेंबरला तोडफोड करण्यात आली. त्यानंतर त्या ठिकाणी अनेक घटनांना सुरुवात झाली. आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या घटनेबद्दल सभागृहात महत्त्वाची माहिती दिली. “10 डिसेंबर 2024 रोजी साधारण 4.30 ते 4.45 दरम्यान दत्तराव सोपनराव पवार (४७) या माणसाने संविधानाची जी प्रतिकात्मक प्रत आहे तिथे काच फोडली, तोडफोड केली. मूळात ही घटना घडल्यानंतर त्या ठिकाणी पोलिसांना जशी माहिती मिळाली, पोलीस घटनास्थळी पोहोचले” अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली. “त्या ठिकाणा मोठ्या प्रमाणात जमाव वाढू लागला होता. जमावाने त्या रोडवरुन जाणाऱ्या एका ट्रकची काच फोडली. रास्ता रोको आंदोलन सुरु केलं” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“काही लोकांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन करुन तिथे यायला सांगितलं. त्या जमावातील काही मंडळी शांततेने सर्व झालं पाहिजे यासाठी प्रयत्न करत होती. जिल्हाधिकारी तिथे आल्यानंतर त्यांनी जमावाशी चर्चा केली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घातला. सगळ्यांशी चर्चा झाल्यानंतर जमाव तिथून निघून गेला. त्यातले 60-70 लोक रेल्वे स्टेशनवर गेले. त्यांनी नंदीग्राम एक्सप्रेस अडवून रेल रोको आंदोलन केलं. त्यांची समजूत घातल्यानंतर त्यांनी रेल रोको आंदोलन मागे घेतलं” असं देवेंद्र फडणवीस विधानसभेत म्हणाले.

दत्तराव सोपनराव पवार खरच मनोरुग्ण का?

संविधानाच्या प्रतिकात्मक प्रतीची तोडफोड करणाऱ्या दत्तराव सोपनराव पवारबद्दल फडणवीस यांनी सभागृहाला माहिती दिली. “एकतर हा जो आरोपी आहे, तो मनोरुग्ण आहे का? हे तपासण्यासाठी चार डॉक्टराची समति तयारी केली. मानसोपचार विभागाचे डॉक्टर त्यात होते. त्यांनी जो अहवाल दिला, त्यानुसार तो मनोरुग्ण असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. 2012 पासून त्याच्यावर उपचार सुरु आहेत” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सकल हिंदू समाजाच्या मोर्चाशी संबंध जोडण्याची थिअरी कशी खोडली?

परभणीत हे जे घडलं, त्याचा सकल हिंदू समाजाच्या मोर्चाशी संबंध जोडून कारस्थानाची थिअरी लावली जात आहे. तो दावादेखील फडणवीस यांनी खोडून काढला. “सकल हिंदू समाजाचा मोर्चा झाला, तो 11 वाजून 10 मिनिटं ते 12 वाजून 35 मिनिटापर्यंत. त्यानंतर पाच तासांनी ही घटना घडली. बांग्लादेशी अल्पसंख्यांकासाठी हा मोर्चा होता. या मोर्चात राजकीय नेत्यांची भाषण झाली नाहीत. साधू-संत बोलले. संविधानाबद्दल कुणीही काहीही बोललं नाही. म्हणजे कारस्थानाची थिअरी लावून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न चुकीचा आहे” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. परभणीत काय घडलं? तो घटनाक्रम फडणवीस यांनी सभागृहात सांगितला.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)