महायुतीत वाद, 34 ठिकाणी बंडखोर, त्यानंतर विजय कसा? काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले आहे. यामध्ये महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीचा सफाया झाला आहे. यामुळे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या निवडणूक प्रक्रियेवर शंका उपस्थित केली. विजय वडेट्टीवार म्हणाले, अमित शहा यांच्यासारखे चाणक्य असतानाही महायुतीमधील तिन्ही पक्षांना जागा वाटपाचा वाद सोडवता आला नाही. विधानसभा निवडणुकीत 34 ठिकाणी बंडखोर उभे होते. दुसरीकडे आमच्यात कोणताही वाद नव्हता. एखादा दुसरा अपवाद सोडला तर आम्ही एकत्र लढलो. त्यामुळे महायुतीचा हा विजय जनतेला न पचणारे आहे.

त्यावेळीही इतक्या कमी जागा नव्हत्या

2014 मध्ये मोदी लाट होती. त्यावेळी आम्ही 42 जागा जिंकल्या होत्या. 2019 मध्ये पुलवामा सारख्या घटना घडल्या. त्यावेळी दोन आकड्यांपर्यंत काँग्रेस जाणार नाही, असे सांगितले गेले. आम्ही 44 जागा जिंकल्या. आता आम्हाला 16 जागा मिळाल्या. सरकारच्या विरोधात वातावरण होते. त्यानंतर आम्हाला अपयश आहे. त्यामुळे लोकांनाच प्रश्न पडला आहे, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

सरकारच्या विरोधात लोकांचा एवढा आक्रोश असताना लाडकी बहीणच्या नावाने पाच टक्के मते फिरलीही असतील का? लाडकी बहीण सामोर करून दुसरा प्रयोग तर केला गेला नाही ना? असा प्रश्न जनतेलाही पडला असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. नाना पटोले प्रदेशाध्यक्षाच्या राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याच्या बातमीवर ते म्हणाले, मला आत्ता अशी माहिती मिळली आहे. आता त्यांची भूमिका काय आहे, त्याची मी माहिती घेत आहे. सध्या मला पूर्ण माहिती नाही.

सरकारवर जनतेचा प्रचंड राग

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार? यावर बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांना माझ्या शुभेच्छा आहेत. महाराष्ट्रातील नवे सरकार आता शेतकऱ्यांनासाठी काय करते, त्यावर आमचे लक्ष असणार आहे. महागाई, राज्यातील प्रश्न यावर विरोधक म्हणून आमची भूमिका पार पाडू. शेतकरी संकटात आहे. सोयाबीन, कापूस विकला जात नाही. महागाई उच्चांकावर आहे. मध्यमवर्गीयांचे जगणे कठीण झाले आहे. सरकारवर राग असताना अशा प्रकारचा निकाल येत असल्याबद्दल वडेट्टीवार यांनी आश्चर्य व्यक्त केले.

हा विजय ईव्हीएमचा

भाजपने छोटे राज्य द्यायचे आणि मोठा राज्य बळकवणे, असा प्रकार सुरु केला आहे. तेलंगाना द्यायचा आणि मध्य प्रदेश घ्यायचा, मग लोकांना सांगायचे ईव्हीएम त्या ठिकाणी नाही का? हा भाजप महायुतीचा विजय नाही तर ईव्हीएमचा विजय दिसत आहे. कोणी कितीही दावा केला तरी विजय ईव्हीएमचा आहे, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)