Congress: काँग्रेसकडून राज्यात मोठी कारवाई; लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी प्रदेश सचिवासह माजी आमदाराचे निलंबन

मुंबई: नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील ४८ पैकी सर्वाधिक जागा काँग्रेस पक्षाने जिंकल्या. राज्यात काँग्रेसची ताकद वाढली असली तरी या निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी काँग्रेसने आज १२ जून रोजी पक्षातील दोन नेत्यांचे निलंबन केले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशाने माजी आमदार नारायणराव श्रीमंतराव मुंडे आणि प्रदेश काँग्रेसचे सचिव प्रशांत गावंडे या दोन नेत्यांना पक्षातून निलंबित केले आहे.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक १३ जागा जिंकल्या असल्या तरी पक्षाचा अकोला लोकसभा मतदारसंघात पराभव झाला होता. अकोल्यातील पक्षविरोधी कारवायांवर काँग्रेस अॅक्शन मोडमध्ये येत त्यांनी जिल्ह्यातील पहिले निलंबन केले. पक्षाने प्रदेश काँग्रेस सचिव प्रशांत गावंडे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशाने काँग्रेस पक्षातून 6 वर्षांसाठी निलंबीत करण्यात आले. गावंडे यांनी काँग्रेसचे उमेदवार डॉ.अभय पाटील यांच्याविरोधात विंचितचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांचे काम केले. विशेष म्हणजे प्रशांत गावंडे स्वत: या मतदारसंघातून इच्छूक होते. मात्र पक्षाने अभय पाटील यांना उमेदवारी दिली.
हिंदू धर्म स्वीकारलेले शिवराम आर्य यांचे मतपरिवर्तन, आर्थिक अडचणीला कंटाळून पुन्हा मुस्लिम धर्म स्वीकारणार

नेमके कोण आहेत प्रशांत गावंडे

सध्या प्रदेश काँग्रेस सचिव असलेले गावंडे यांची पक्षात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे कट्टर समर्थक ओळख आहे. ते अकोल्यातील सर्वपक्षीय ‘शेतकरी जागर मंच’ या गैरराजकीय शेतकरी आंदोलनाचे संस्थापक आहेत. 5 वर्षांपूर्वी भाजपचे तत्कालिन जेष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी शेतकरी जागर मंचाच्या व्यासपीठावरून केलेले शेतकरी आंदोलन देशभर गाजले होते.


प्रशांत गावंडे यांचा काँग्रेसच्या राहूल गांधी, सोनिया गांधी, मुकूल वासनिक, के. सी. वेणुगोपाल, रमेश चेन्नीथला या नेत्यांशी थेट संपर्क आहे. अकोल्यात भाजपचे संजय धोत्रे यांचे कट्टर विरोधक अशी ओळख. ‘महाबीज’ संचालक पदाच्या निवडणुकीत संजय धोत्रेंना दिलं होतं तगडं आव्हान. थोडक्यात झाला होता पराभव. यावेळी लोकसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने आंबेडकरांचे काम केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता.