देशभरात सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू आहे. राज्यात सर्व मतदारसंघांत निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली असली, तरी अद्याप आचारसंहिता कायम आहे. परिणामी, राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसान आणि दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मदतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. याशिवाय राज्यात आता अनेक जिल्ह्यांत मान्सूनपूर्व कामांना सुरुवात होत आहे. यामध्ये रस्त्यांच्या कामांसोबतच इतर अनेक कामांचा समावेश आहे. शिवाय, जून महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यातील शाळांना सुरूवात होणार असल्याने त्याच्या तयारीसाठीही अनेक उपाययोजना करण्याची गरज आहे. मात्र, आचारसंहिता लागू असल्याने त्याचा थेट फटका या तयारीवर बसला असल्याने सध्या आचारसंहितेचे काही नियम शिथिल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
दरम्यान, आपत्कालीन परिस्थितीबाबत उपाययोजना करताना कोणत्याही आचारसंहितेच्या नियमांचा फटका बसणार नसल्याची माहिती मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘मटा’शी बोलताना दिली. मात्र, मान्सूनपूर्व कामांना फटका बसू नये म्हणून राज्याचे मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांनी राज्य निवडणूक आयोगाला काही दिवसांपूर्वीच पत्र पाठविले असल्याची माहिती या अधिकाऱ्यांकडून दिली. मुख्य सचिवांनी राज्य निवडणूक अधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्राचा आधार घेऊन आयोगाने आता हे पत्र केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवले आहे. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोग यासंदर्भात अंतिम निर्णय घेणार असल्याचे सांगितले जात आहे.
‘दोन दिवसांत निर्णय’
आचारसंहिता शिथिल करण्याबाबत केंद्रीय निवडणूक आयोग येत्या दोन दिवसांत अंतिम निर्णय जाहीर करेल, अशी शक्यता मंत्रालयातील सूत्रांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’शी बोलताना व्यक्त केली. या संदर्भात राज्य निवडणूक आयोगाकडे विचारणा केली असता केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पत्रव्यवहार केला असून लवकरच निर्णय अपेक्षित असल्याचे स्पष्ट करण्यात आले.