सीएम योगींचा 80-20, तर अखिलेश यादवांचा 90-10 फॉर्म्यूला, उत्तर प्रदेश जिंकण्यासाठी नवा डाव!

Uttar Pradesh Vidhan Sabha Election 2027 : उत्तर प्रदेशमध्ये 2027 साली विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची तयारी आतापासूनच चालू झाली आहे. सध्या विरोधी बाकावर बसलेले समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव ही निवडणूक जिंकण्यासाठी 90-10 च्या फॉर्म्यूल्यावर आपली रणनीती आखत आहेत. तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 80-20 या फॉर्म्यूल्यावर जोर दिलाय. याच पार्श्वभूमीवर या फॉर्म्यूल्यांचा अर्थ काय? तसेच उत्तर प्रदेशची 2027 सालची निवडणूक जिंकण्यासाठी भाजपा आणि समाजवादी पार्टी नेमकी काय रणनीती आखत आहे, हे जाणून घेऊ या..

80-20 विरुद्ध 90-10 फॉर्म्यूला काय आहे?

अखिलेश यादव यांनी 2027 सालची निवडणूक ही 80-20 नव्हे तर 90-10 अशी होणार आहे, असं म्हटलंय. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टी भाजपाला खाली खेचण्यासाठी दलित, पिछडा आणि अल्पसंख्याक म्हणजेच ‘पीडीए’चं राजकारण करत आहेत.2024 सालच्या लोकसभा निवडणुकीत समाजवादी पार्टीला याच सूत्राचा फार फायदा झाला होता. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठीही अखिलेश यादव याच सूत्राला घेऊन निवडणूक लढवणार आहेत. दुसरीकडे भाजपा आगामी निवडणुकीत सवर्ण, मागास आणि दलितांच्या व्होट बँकेकडे लक्ष ठेवून असून पुन्हा एकदा ‘बंटोगे तो कटोगे’ आणि ‘एक हैं तो सेफ हैं’ अशा घोषणांच्या मदतीने 80-20 च्या सूत्रानुसार राजकारण करत आहे.

सीएम योगींचा 80-20 फॉर्म्यूला काय?

योगी आदित्यनाथ यांनी 80-20 या फॉर्म्यूल्यावर भाष्य केलं होतं. राज्यात 80 टक्के लोकांना भाजपाचा झेंडा आवडतो. तर 20 टक्के लोक असे आहेत जे विकास नव्हे तर स्वार्थी राजकारणाला प्राथमिकता देतात, असं त्यांनी म्हटलं होतं. मात्र त्यांच्या 80-20 या सूत्राकडे धार्मिक राजकारणाच्या दृष्टीकोनातून पाहिलं जातं. कारण उत्तर प्रदेशात साधारण 80 टक्के जनता ही हिंदू आहे तर 20 टक्के जनता ही मुस्लीम धर्मीय आहे. त्यामुळे राजकीय जाणकार 80-20 या फॉर्म्यूल्याकडे हिंदू आणि मुस्लीम अशा अर्थाने पाहतात. त्यांनी हाच 80-20 फॉर्म्यूला आगामी विधानसभा निवडणुकीतही असेल असे सूतोवाच केले आहेत.

अखिलेश यादव यांचा 90-10 फॉर्म्यूला काय?

अखिलेश यादव यांनी भाजपाच्या 80-20 फॉर्म्यूल्याचा सामना करण्यासाठी 90-10 हा फॉर्म्यूला आणला आहे. अखिलेश यादव यांच्या या फॉर्म्यूल्याकडे जातीच्या आधाराने पाहिले जात आहे. तर योगींच्या 80-20 या फॉर्म्यूल्याकडे धर्माच्या दृष्टीकोनातून पाहिलेज जाते. म्हणजेच भाजपाच्या धार्मिक ध्रुवीकरणाच्या राजकारणाला समाजवादी पार्टी जातीय ध्रुवीकरणाने उत्तर देण्याची शक्यता आहे. 9० टक्के समाजामध्ये अखिलेश याद हे समाजवादी विचारधारा जोपासणारे तसेच आंबेडकरवादी मतदारांचा समावेश करून पाहात आहेत. तर समाजवादी पार्टी मागास, दलित आणि अल्पसंख्याक व्होट बँकेकडे डोळा ठेवून आहे.

अखिलेश यादव यांची कोणत्या मतदारांवर नजर?

अखिलेश यादव यांच्यानुसार मागास, दलित आणि अल्पसंख्याक मतदार भाजपाच्या विरोधात आहेत. त्यामुळे या मतदारांकडे यादव यांचे लक्ष आहे. तसेच भाजपाला माणणारा मात्र केंद्र तसेच राज्य सरकारच्या काही धोरणांवर नाराज असणाऱ्या मतदारांवरही यादव यांची नजर आहे. दलित मतदारांना जोडण्यासाठीही अखिलेश यादव वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी 8 ते 14 एप्रिल हा काळ स्वाभिमान समारोह म्हणून साजरा करण्याचे ठरवले आहे.

उत्तर प्रदेशात कोणत्या समाजाचे किती प्रमाण?

उत्तर प्रदेशमध्ये एकूण 43 टक्के जनता ही मागास आहे. 21 टक्के जनता ही दलित तर 19 टक्के जनता ही मुस्ली आहे. 0.6 टक्के लोक हे अनुसूचित जनजाती प्रवर्गात मोडतात. उत्तर प्रदेशात दलित, मागास, मुस्लीम आणि आदिवासींची संख्या ही साधारण 85 टक्के आहे. त्यामुळे या मतदारांना आकर्षित करण्याचा समाजवादी पक्षाकडून प्रयत्न आहे.

दरम्यान, अखिलेश यादव यांचा हा प्रयत्न किती यशस्वी ठरणार की योगी आदित्यनाथ यांचा 80-20 हाच फॉर्म्यूला जादू करणार, हे आगामी काळात स्पष्ट होईल. त्याचीच पूर्वतयारी म्हणून उत्तर प्रदेशातील राजकारण हळूहळू तापू लागणार आहे, हे मात्र नक्की.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)