राज्य सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना शासनाकडू दरमहा १५०० रुपये मिळणार असून १ जुलैपासून नाव नोंदणी सुरु झाली आहे. तर ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज भरण्याची मुदत देण्यात आली आहे. यामुळे राज्यभरात योजनेचा अर्ज भरण्यासाठी महिला तलाठी कार्यालयासमोर मोठी गर्दी करताना दिसत आहेत. यातच योजनेसाठी अर्ज भरताना महिलांची आर्थिक लूट होत असल्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे या प्रकारांना चाप लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानभवन परिसरात पत्रकारांशी बोलताना पैसे घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे.
मुख्यमंत्री म्हणाले, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना शासनाने जिव्हाळ्याने सुरु केली आहे. यामुळे अर्ज करताना महिलांची कोणतीही गैरसोय होऊ नये, त्यांच्याकडून कोणीही पैशांची मागणी करु नये, असे सक्त आदेश दिले आहेत. लाडकी बहीण योजनेत अडथळे आणणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाणारच.
नेमका प्रकार काय?
अमरावती मधील एका तलाठ्याने महिलांकडून पैसे घेतल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. याची दखळल घेत तलाठ्याचे तात्काळ निलंबन करण्यात आले. यासोबतच अकोल्यातूनही असाच प्रकार समोर आला. लाडकी बहीण योजनेसाठी उत्पन्नाचा दाखला अपेक्षित असून उत्पन्नाचा दाखला मिळवण्यासाठी पटवारीचा दाखला देखील तितकाच महत्वाचा असतो. हा दाखला मिळवण्यासाठी अकोल्यातल्या मोठी उमरी भागातल्या तलाठी कार्यालयावर महिलांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. यादरम्यान तलाठी चक्क पटवारीचा दाखला देण्यासाठी महिलांकडून पैसे उकळत असल्याचा प्रकार समोर आला. तसेच अन्य काही भागांतही तहसील कार्यालयाच्या आवारात येणाऱ्या महिलांची लूट करण्यासाठी दलाल सक्रिय झाल्याचे वृत्त समोर आले. यानंतर एकच खळबळ उडाली होती. याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे आश्वस्त केले आहे.