CM Eknath Shinde: अखेर ‘त्या’ मजुराच्या कुटुंबियांना न्याय मिळाला, एकनाथ शिंदेंच्या हस्ते मदतीचा धनादेश सुपूर्द

म.टा.खास प्रतिनिधी, मुंबई : फाउंटन हॉटेलजवळ वर्सोवा खाडीपाशी झालेल्या दुर्घटनेत जेसीबीसह अडकलेल्या मजुराच्या कुटूंबियांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मदतीचा धनादेश रविवारी सुपूर्द करण्यात आला आहे. राकेश यादव यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी बोलावून त्यांना हा धनादेश देण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमएमआरडीएला दिलेल्या निर्देशानुसार एल अँड टी कंपनीच्या वतीने ३५ लाख रुपये तर १५ लाख विम्याचे असे ५० लाखांचा धनादेश आज राकेश यादव यांच्या कुटूंबियांना देण्यात आला. तसेच राकेशचा भाऊ दुर्गेश याला एल अँड टी कंपनीमध्ये नोकरीही देण्यात आली आहे.

एमएमआरडीएच्या वतीने वर्सोवा खाडीत सुरू असलेल्या पाईपलाईनच्या कामावेळी जेसीबी ऑपरेटर असलेले राकेश यादव हे जेसीबी सकट मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी १७ दिवस प्रयत्न करूनही बचाव पथकाला अपयश आले. अखेर याठिकाणी सैन्यदल, तटरक्षक दल, एनडीआरएफ एसडीआरएफच्या जवानांना एकत्रितपणे मदतकार्यासाठी पाचारण करण्यात आले आहे. मात्र यावेळी वरून कोसळणारा पाऊस आणि त्यात सुरू असलेल्या बचावकार्यामुळे त्यात अनेक अडचणी येत होत्या. तरीही शर्थीचे प्रयत्न करून राकेश यांचा मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तत्पूर्वी कुटूंबाला मदत म्हणून हा मदतनिधी रविवारी त्यांच्या कुटूंबियांच्या हाती सुपूर्द करण्यात आला आहे.
काल, आज अन् उद्याही मी कार्यकर्ता म्हणूनच काम करेन मुख्यमंत्री म्हणून नाही – एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी राकेश यांच्या पत्नी सुशीला यादव, वडील भालचंद्र यादव, मुली रिशु आणि परी यादव, मुलगा रिंकू यादव आणि भाऊ दुर्गेश यादव यांच्यासोबत एमएमआरडीए आणि एल अँड टीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तसेच एमएमआरडीएचे सह- आयुक्त राधबिनोद शर्मा, एमएमआरडीएचे मुख्य अभियंते चामलवार, एमएमआरडीएचे वरिष्ठ अभियंते हनुमंत सोनवणे, एल अँड टीचे प्रकल्पप्रमुख श्री कॉलिन, माजी नगरसेवक एकनाथ भोईर यांनी देखील यावेळी उपस्थित होते.