मुख्यमंत्री कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील हल्ला करणार असल्याचा उल्लेख या धमकीत आहे. तर अशा धमक्यांना भीक घालत नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयावर हल्ला करण्याच्या धमकीचा मेसेज आला आहे. मुंबई वाहतूक पोलिसांना व्हॉट्स अॅपवर हा धमकीचा मेसेज मिळाला असल्याची माहिती समोर आली आहे. या धमकीच्या मेसेजनंतर मुंबई पोलीस अलर्टवर असून तपासाला सुरुवात करण्यात आली आहे. हा धमकीचा मेसेज पाकिस्तानी नंबरवरून आल्याचं समोर आलं आहे. मलिक शाहबाज हुमायुन रजा देव असं हा धमकीचा मेसेज पाठवणाऱ्याचं नाव आहे. या धमकीच्या मेसेजनंतर गुप्तचर यंत्रणा देखील अलर्टवर आहे. तर याबद्दल प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलं की, पोलीस याबद्दल तपास करत आहेत, तेच माहिती देऊ शकतील. अशाप्रकारच्या धमक्या येत असतात. अशा धमक्यांना भीक घालणाऱ्यातले आपण नाही आहोत, असंही फडणवीस यांनी म्हंटलं आहे.