CM Devendra Fadnavis : मंत्र्यांनी अशा प्रकरणात बोलताना.. , मुख्यमंत्री फडणवीसांचा मंत्री कदम, सावकारेंना घरचा आहेर

गृह राज्यमंत्री योगेश कदम आणि राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी स्वारगेट अत्याचार प्रकरणात केलेल्या वादग्रस्त विधानांनंतर त्यांच्यावर विरोधी पक्षाकडून जोरदार टीका होत आहे. त्यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही मंत्र्यांना घरचा आहेर दिलेला बघायला मिळाला आहे. अशा प्रकरणांत बोलताना मंत्र्यांनी संवेदनशीलता बाळगावी असा सल्ला देखील फडणवीस यांनी दिला आहे.

गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी स्वारगेट अत्याचार प्रकरणात पीडितेने स्ट्रगल केला नसल्याचं म्हंटलं होतं. तर त्यानंतर राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनीही अशा घटना पुण्यातच नव्हे तर संपूर्ण देशात घडतच असतात असं वादग्रस्त विधान केलं होतं. त्यानंतर या दोन्ही मंत्र्यांवर विरोधीपक्षाकडून चांगलीच टीकेची झोड उठलेली बघायला मिळाली. याविषयी बोलताना आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, माझ्या मते मंत्री योगेश कदम जे बोलले ते वेगळ्या पद्धतीने घेतले गेले. ते केवळ घटना घडली ते ठिकाण वर्दळीचे होते, बसमध्ये आत नव्हती तर बाहेर होती, त्यानंतरही प्रतिकार न झाल्यामुळे अशी एखादी घटना घडल्याचे लोकांना समजले नाही असे ते सांगण्याचा प्रयत्न करत होते. योगेश कदम नवीन आहेत. तरुण मंत्री आहेत. काही करण्याचा प्रयत्न करत आहेत. मी त्यांना सल्ला देईन की, अशा प्रकरणांत बोलताना संवेदनशीलता बाळगली पाहिजे. कारण, बोलताना काही चूक झाली तर त्याचा समाजमनावर परिणाम होतो. त्यामुळे मंत्री असो की लोकप्रतिनिधी संवेदनशीलतेने बोलावे असा माझा सल्ला आहे, असं फडणवीस यांनी म्हंटलं आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)