Children’s Health : चिंताजनक! लहान मुलांना उन्हाळी आजरांचा त्रास, ‘अशी’ घ्या मुलांची काळजी

प्रतिनिधी, पुणे : वाढत्या उष्णतेमुळे लहान मुलांना सर्दी-खोकला, घसादुखी, पोटदुखी, जुलाब-उलट्या यासारख्या आजारांचा सामना करावा लागत आहे. उष्णतेबरोबरच बर्फ घातलेली पेये प्यायल्यामुळे आणि उघड्यावरचे पदार्थ खाल्ल्याने या प्रकारच्या समस्या वाढल्याचे निरीक्षण बालरोग तज्ज्ञांनी नोंदविले आहे. बर्फ आणि अस्वच्छ पाण्यामुळे मुलांमध्ये आरोग्याच्या समस्या वाढू शकतात, त्यामुळे काळजी घेण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.शहरातील तापमानाचा पारा मे महिन्याच्या सुरुवातीला ४० अंशापर्यंत गेला होता. त्यानंतर अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे तापमानात बदल झाला. शहरात सद्यस्थितीत कधी ढगाळ, कधी ऊन, तर कधी दमट वातावरण आहे. यामुळे श्वसनविकार, ॲलर्जी आणि तापाच्या रुग्णांध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

S. Jaishankar :देशात वस्तूनिर्मितीला महत्त्व द्यावेच लागेल- परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांचे मत
बालरोग तज्ज्ञ डॉ. समिधा भगत यांनी वातावरणामुळे पोटदुखी, श्वास घेण्यास त्रास होणे, घसा दुखणे किंवा लाल होणे, ताप येणे या प्रकारच्या समस्या वाढल्याचे निरीक्षण नोंदविले. उन्हाळी आजाराचा त्रास एक ते सहा वर्षांच्या मुलांमध्ये वाढल्याचे त्यांनी सांगितले.

बर्फामुळे समस्या

बालरोग तज्ज्ञ डॉ. दिलीप सारडा म्हणाले, ‘गेल्या काही दिवसांपासून लहान मुलांना जुलाब आणि उलट्यांचा त्रास होत आहे. बर्फ अस्वच्छ पाण्यापासून तयार केलेला असेल, तर त्यापासून आरोग्याच्या समस्या वाढू शकतात. बर्फामध्ये विषाणू बराच काळ जिवंत असतात. त्यामुळे दूषीत बर्फातून विषाणूजन्य आजारांचा संसर्ग वाढतो.’

मुलांना त्रास कशामुळे?

वातावरणातील बदलांमुळे लहान मुलांना सर्दी, ताप, खोकला आणि जुलाब या प्रकारचा त्रास होत असतो. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने लहान मुलांना पुरेसे पाणी प्यायला द्यावे. उन्हाच्या वेळी बाहेर फिरू देऊ नये. बाहेर उष्ण वातावरण आणि घरात थंड पाणी किंवा पदार्थांचे सेवन केल्यानेही मुलांना त्रास होतो.

स्वच्छता आवश्यक

‘अस्वच्छतेमुळे मुले आजारी पडण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे मुलांना स्वच्छ हात धुणे आणि स्वच्छता पाळणे आवश्यक आहे,’ असे ससून सर्वोपचार रुग्णालयातील बालरोग विभाग प्रमुख डॉ. आरती किणीकर यांनी सांगितले.

दूषित पाण्यामुळे आजार

शहरात गेल्या तीन महिन्यांमध्ये गॅस्ट्रोच्या ५६० रुग्णांची नोंद झाली आहे. जानेवारी २०६, फेब्रुवारी १५७, मार्च महिन्यात १९७ गॅस्ट्रोच्या रुग्णांची नोंद झाल्याची माहिती महापालिका आरोग्य विभागाने दिली. दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रोच्या आजारांमध्ये वाढ होत असते; तसेच पाण्यामुळे त्वचाविकार होण्याची शक्यता अधिक असते. आरोग्याच्या विविध समस्या टाळण्यासाठी पाणी उकळून पिण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला.