धारावीचा ‘आत्मा’ कायम राखतच पुनर्विकास; आढावा बैठकीत मुख्यमंत्री फडणवीसांचे महत्त्वाचे निर्देश!

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे ‘धारावी पुनर्विकास प्रकल्पासंदर्भात आढावा बैठक’ संपन्न झाली. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांनी संबंधित विभागाला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, धारावीची खरी ओळख म्हणजे इथला कुशल श्रमशक्तीवर आधारित अर्थव्यवस्थेचा अनोखा चेहरा. लाखो कारागीर, लघुउद्योग, वंचित घटक यांचा जीव की प्राण असलेल्या या भागाचा आत्मा कायम राखतच पुनर्विकास व्हावा, हे प्राधान्याने अधोरेखित करण्यात आले.

धारावी हा देशाचा आर्थिक नकाशा बदलणारा पट्टा आहे. त्यामुळे येथील पुनर्विकास पर्यावरणस्नेही, सर्वसमावेशक आणि संवेदनशील पद्धतीने व्हावा. प्रत्येक धारावीकराला या प्रकल्पात सामावून घेण्याची जबाबदारी प्रशासनाने नाकारू नये, यावर भर देण्यात यावा असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, स्थानिक व्यवसायांचे पुनर्वसन मूळ जागेच्या सन्मानासह व्हावे, ही अट बंधनकारक ठरवली आहे. व्यवसायांची पारंपरिक ओळख कायम राहावी आणि पुनर्विकासाचा भाग होणाऱ्या प्रत्येक नागरिकाला विश्वासात घेतले जावे, यासाठी समन्वय आणि संवेदना यांची सांगड घालण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

धारावीचा आत्मा जपणाऱ्या आणि भविष्याच्या शक्यता उलगडणाऱ्या या ऐतिहासिक प्रकल्पाची कार्यवाही अधिक गतिमान होईल, अशी अपेक्षा या बैठकीतून व्यक्त करण्यात आली, या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी खासदार राहुल शेवाळे, धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अप्पर मुख्य सचिव, प्रधान सचिव आणि विविध यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्पासंदर्भात काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)