Devendra Fadnavis Mumbai Metro: मुंबईत लोकल प्रवास करणे एक दिव्यच असते. लोकलची संख्या वाढल्यानंतर गर्दी कमी होत नाही. त्यामुळे मुंबईत लोकलप्रमाणे इतर पर्याय तयार केले जात आहे. मुंबईत मेट्रो प्रकल्प सुरु आहे. परंतु मेट्रोचे सर्वात मोठे नेटवर्क दिल्लीत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत मेट्रो कनेक्टीव्हीटीसाठी नवीन टारगेट सेट केले आहे. महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच एमएमआरडीएला दरवर्षी 50 किलोमीटर मेट्रो नेटवर्क सुरु करण्याचे टारगेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. मुंबईत सध्या 59.19 किलोमीटर मार्गावर मेट्रो सुरु आहे. तसेच 143.65 किलोमीटर मार्गावर काम सुरु आहे. दुसरीकडे दिल्लीत 351 किलोमीटर रेल्वे नेटवर्क सुरु झाले आहे. तसेच 65 किलोमीटर नेटवर्कचे काम सुरु आहे.
कामाला उशीर होऊ देऊ नका
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवार मेट्रो प्रकल्पांचा आढावा घेतला. यावेळी प्रकल्पांचा कामाला उशीर होऊ देऊ नका, असे स्पष्ट निर्देश त्यांन दिले. त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले की, काम पूर्ण करण्याची डेडलाइन तयार करा, दरवर्षी 50 किलोमीटर मेट्रो लाईन सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरु झाली पाहिजे. मुंबईतील अनेक मेट्रो प्रकल्प रखडले आहेत. त्यामुळे फडणवीस यांनी मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटीला नवीन डेडलाइन निश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत.
मुंबई मेट्रोचे नवीन कॉरीडोर
- मेट्रो 12 (कल्याण ते तलोजा) – प्राथमिक काम सुरु
- मेट्रो 10 (गायमुख ते शिवाजी चौक-मीरा रोड)-काम सुरु होणे बाकी
- मेट्रो 2 बी (डीएन नगर ते मंडाले)- 80 टक्के काम पूर्ण (23.6 किमी)
- मेट्रो 4 आणि 4ए (वडाळा ते कासरवडवली आणि परत गायमुखपर्यंत)-80 टक्के पूर्ण
- मेट्रो 5 (ठाणे-भिवंडी-कल्याण)-95 टक्के काम पूर्ण (24.9 किमी)
- मेट्रो 6 (स्वामी समर्थ नगर-विक्रोली)-77 टक्के काम पूर्ण (14.5 किमी)
- मेट्रो 9 आणि 7ए (दहिसर पूर्व-मीरा भायंदर-अंधेरी पूर्व-सीएसएमआयए)-92 टक्के सिव्हील काम पूर्ण
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) ची समीक्षा बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ उपस्थित होत्या. यावेळी फडणवीस यांनी सांगितले की, अनेक ठिकाणी कार शेड विना मेट्रो सुरु आहे. त्यासाठी प्रतिक्षा करु नये. जगभरात असे प्रयोग होत आहे. त्याचा अभ्यास करा, असे फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.