MPSC Exam: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) राज्य सरकारच्या विविध पदांची भरती केली जाते. सरकारी अधिकारी होण्यासाठी राज्यभरातील युवक प्रयत्न करत असतात. वर्षानुवर्ष स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असतात. आयोगाने राज्यातील परीक्षेचा पॅटर्न यावर्षापासून बदलला आहे. आता एमपीएससीची परीक्षा यूपीएससीप्रमाणे होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच या परीक्षेसंदर्भात इतर महत्वाची माहिती त्यांनी सभागृहात सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना दिली.
संपूर्ण वेळापत्रक तयार करणार
सन २०२५ पासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पद्धतीप्रमाणे डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपात घेण्यात येईल. तसेच या स्पर्धा परीक्षांचे आणि मुलाखतीचे संपूर्ण वेळापत्रक तयार करून त्यानुसार त्या घेतल्या जातील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले. विधान परिषद आमदार शिवाजीराव गर्जे, प्रवीण दरेकर आणि विक्रम काळे यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती, त्यास मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले.
A proposal is being prepared for restructuring the MPSC by studying all state commissions and the UPSC to facilitate a large-scale recruitment process in the future.
पुढील काळात मोठ्या प्रमाणात भर्ती प्रक्रिया राबवण्यासाठी सर्व राज्यांचा आणि ‘यूपीएससी’चा अभ्यास करून… pic.twitter.com/uHcEXy4ypa
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 19, 2025
यूपीएससीची तयारी होणार
महाराष्ट्रातील विद्यार्थी हा यूपीएससी सोबत एमपीएससीची परीक्षा देत असतो. दोन्ही परीक्षेचा पॅटर्न वेगळा असल्याने तो आता एकसमान करण्यात येत आहे. त्याचबरोबर एमपीएससीला अधिक सक्षम करण्यासाठी नवीन पदे सुधारित आकृतीबंधाद्वारे मंजूर करण्याची कार्यवाही सुरू आहे. यापुढे वर्ग १, वर्ग २ आणि वर्ग ३ ची पदभरती अधिक गतीने करण्यासाठी आयोगाची पुनर्रचना केली जाईल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
५४० उमेदवारांना नियुक्ती आदेश
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने १२ नोव्हेंबर २०२४ च्या पत्रान्वये ६१७ उमेदवाराची शासनास शिफारस केली होती. त्यातील कागदपत्रे तपासणीसाठी हजर ५४० उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पुढील काळात मोठ्या प्रमाणात भर्ती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. तसेच यूपीएससी परीक्षेचा अभ्यास करून ‘एमपीएससी’च्या पुनर्रचनेचा प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.