पुणे अत्याचाराची घटना नेमकी कशामुळे घडली? छगन भुजबळांनी सांगितला घटनाक्रम

पुण्याच्या स्वारगेट बलात्कार प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या दत्तात्रय गाडे अटक करण्यात अखेर पोलिसांना यश आलं आहे. तब्बल 72 तासांच्या अथक प्रयत्नानंतर पोलिसांनी दत्तात्रय गाडेच्या मुसक्या आवळल्या. मध्यरात्रीच्या अंधारात पोलिसांनी त्याला अटक केली. दत्ता गावातच असल्याची टिप मिळाली होती. तो शेताच्या दिशेने गेल्याचंही पोलिसांना समजलं. यानंतर पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी सापळा रचला. त्याला चारही बाजूने घेरण्यात आले आणि अखेर दत्तात्रय गाडेने शरणागती पत्करली. आज त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे. या घटनेवर अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत. आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली.

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना पुणे अत्याचाराच्या घटनेबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली. छगन भुजबळ यांनी पुण्यातील अत्याचाराची घटना कशामुळे घडली? याबद्दलची सविस्तर माहिती दिली.

प्रत्येक माणसांमध्ये पोलीस दडलेला असतो

“महाराष्ट्राला फार मोठी संस्कृती आहे. महाराष्ट्रसुद्धा संस्कृती प्रधान देश आहे. त्याच्यामुळे या घटना होणार नाही, त्याच्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. शासनाने हे प्रयत्न करायला पाहिजे, पोलिसांनी करायला पाहिजे. सामाजिक कार्यकर्त्यांनी, प्रत्येक माणसांनी केले पाहिजे. प्रत्येक माणसांमध्ये पोलीस दडलेला असतो. आजकाल काय फोटो काढतात, निघून जातात. लोकांना रस्त्यावर कोयत्याने मारले जाते. फक्त व्हिडीओ काढले जातात. वाचवण्याचा प्रयत्न करत नाही”, असे छगन भुजबळ म्हणाले.

…त्यामुळे अशा घटना घडतात

“पुण्यातील घटना फारच विचित्र घडलेली आहे. पुणे हे विद्येचे, संस्कृतीचा माहेरघर म्हणून देशात परदेशात मान्यता आहे. अशा गोष्टी होणार नाही, यासाठी दक्षता घेतली पाहिजे. काही वर्षांपूर्वी मुंबईमध्ये बंद पडलेल्या मिलमध्ये जागा मोकळी होती, तेथे अशीच एक घटना झाली. आता सुद्धा तिथे काही बसेस वगैरे बंद अवस्थेत आहे. लाईटची व्यवस्था केली पाहिजे. बंद पडलेल्या बसेस काढल्या पाहिजे. गार्ड सुद्धा ठेवले पाहिजे. तुमचे गार्डन असतील तर टायरपासून सगळंच घेऊन जातील लोक, तिथे अजिबात सिक्युरिटी नसेल तर अशा घटना होतात”, असा दावा छगन भुजबळ यांनी केला.

“ते पण सुसंस्कृत अशा पुण्यामध्ये होत आहे ही एक लिस्ट एक अशी परिस्थिती आहे. पोलीस निश्चितपणे कडक कारवाई करतील. परंतु समाजाने सुद्धा याच्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे”, असेही छगन भुजबळांनी म्हटले.

“अशा गोष्टींना थारा देता कामा नये”

“शक्ती कायद्याबद्दल सगळे मागणी करत आहेत, काहीतरी अडचणी असतील. नवीन कायद्यामध्ये खरोखर किती अंतरभाव आहे, तो पण पाहावा लागेल. कायदा तर कडक झाला पाहिजे. परंतु लोकांनी सुद्धा अशा गोष्टींमध्ये सहज घेता कामा नये. वाचले आणि सोडून दिले एवढे नाही. आपल्या समाजामध्ये अशा गोष्टींना थारा देता कामा नये आणि ज्या तऱ्हेने काही गोष्टी तेथे सापडल्या ते पाहता आजच नाही तर कित्येक महिन्यापासून असे व्यवहार तेथे होतात, असे एकूण मला लक्षात येते”, असेही छगन भुजबळ म्हणाले.

“मोकळ्या बसेस आहेत. अंधार आहेत, सिक्युरिटी नाही. त्यामुळे असे घाणेरडे प्रकार तेथे होत आहे. कोणाच्या लक्षात येत नाही, असे थोडी आहे. जाऊद्या आपल्याला काय करायचे असे मनामध्ये विचार येतात त्यातून असे प्रकार घडतात”, असा आरोपही छगन भुजबळांनी केला.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)