सीएसएमटी आणि ठाणे ब्लॉक वेळेत रेल्वे स्थानकातील प्रवासी गर्दी टाळण्यासाठी अत्यावश्यक असेल तरच रेल्वे प्रवास करावा, शक्य असल्यास रेल्वे प्रवास टाळावा, असे आवाहन मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करन यादव यांनी शुक्रवारी केले आहे. आज, शनिवारी रविवारच्या (सुट्टीच्या) वेळापत्रकानुसार लोकल धावणार आहेत. यामुळे ५३४ लोकल आणि ३७ मेल-एक्स्प्रेस रद्द करण्यात येणार आहे. प्रवासी सुविधेसाठी एसटी आणि बेस्टने प्रवासी सुविधेसाठी अतिरिक्त बसगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
सीएसएमटी ते भायखळा आणि सीएसएमटी ते वडाळा रोड या दरम्यान वाहतूक बंद राहणार आहे. प्रवाशांचे हाल टाळण्यासाठी पश्चिम रेल्वेने रविवारी कोणताही ब्लॉक घेऊ नये, असे आवाहन मध्य रेल्वेने केले होते. मध्य रेल्वेच्या आवाहनाला प्रतिसाद देत, पश्चिम रेल्वेने चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान अप-डाउन जलद मार्गावरील रविवारचा ब्लॉक रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे रविवारी फोर्ट परिसरातील श्रमिक, नोकरदार आणि स्वयंरोजगारीत क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना दादर-चर्चगेटमार्गे प्रवास करून पोहोचण्याचा पर्याय खुला असणार आहे.
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधील फलाट क्रमांक १०-११ वरून २४ डब्यांच्या प्रवासी गाड्या चालवण्यासाठी सुरू असलेल्या फलाट लांबीकरणाच्या कामातील ब्लॉकचा शेवटचा टप्पा शुक्रवारी मध्यरात्री साडेबारानंतर सुरू होणार आहे. रविवार दुपारी साडेतीन वाजेपर्यंत असलेल्या ३६ तासांच्या ब्लॉकमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते भायखळा आणि सीएसएमटी ते वडाळा रोडपर्यंत लोकल बंद राहणार आहेत. ब्लॉकवेळेत सिग्नलसंबंधी तांत्रिक कामे करण्यात येणार आहेत.खासगी-सरकारी कर्मचाऱ्यांना दुसरा आणि चौथ्या शनिवारी सुट्टी असते. आज, पहिला शनिवार असल्याने कर्मचाऱ्यांना कामावर उपस्थित राहणे गरजेचे असणार आहे. शनिवारी सुट्टी न मिळालेल्या आणि अत्यावश्यक सेवेतील कल्याण-कसारा-कर्जत दिशेकडील कर्मचाऱ्यांना दादर स्थानकातून पश्चिम रेल्वेमार्गे प्रवास करून चर्चगेटपर्यंत पोहोचावे लागणार आहे. चर्चगेटवरून बेस्ट बस, शेअर टॅक्सीच्या मदतीने सीएसएमटी, फोर्ट परिसरातील कार्यालय-आस्थापनांमध्ये पोहोचणे शक्य आहे. हार्बरमार्गे येणाऱ्या प्रवाशांना वडाळा रोड स्थानकात उतरून रस्ते मार्गे बस-टॅक्सीमधून कार्यालयात पोहोचणे शक्य होणार आहे.