“ज्यांना मी स्वतः बहिणीप्रमाणे समजत होतो. त्यांच्या 20 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत विभागप्रमुख म्हणून पाठिशी उभा राहिलो. ज्या शिवसेना पक्षांमुळे बाळासाहेबांच्या-उद्धवजींच्या आशिर्वादामुळे समाजात ओळख मिळाली. शेवटी आज त्यांनी गद्दारी केली” असं उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब म्हणाले. अंधेरी वर्सोवा भागातील ठाकरे गटाच्या नेत्या राजूल पटेल यांनी उद्धव ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्या लवकरच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर अनिल परब बोलत होते.
“ही गद्दारी कशाला केली, पैशासाठी की कशासाठी? हे त्यांचं त्यांना माहिती. ही शाखा वाचवण्यासाठी शिवसैनिकांनी रक्त दिलेलं आहे. मी आज हे सांगायला आलोय, त्यांना वाटतंय दुसऱ्या पक्षात जाऊन खूप मिळेल त्यांना लख लाभो” असं अनिल परब म्हणाले. “शाखा आपल्याला सोडायची नाही, ही शाखा कोणाच्या बापाची नाहीय” असं अनिल परब म्हणाले.
‘गद्दार म्हटलं जाईल तेव्हा कळेल’
“अनेकांच्या ताकदीवर ही शाखा उभी राहिली आहे. पोलिसांना सांगतोय, चावी आम्हाला आणून द्या, नाहीतर टाळ तोडून आम्ही आमची शाखा घेऊ. आमच्या शिवसैनिकांच्या नादाला लागू नका. आपल्याला काळजी करायची गरज नाही, आपला आमदार इथं आहे. कोणी पदाधिकारी त्यांच्यासोबत गेलेला नाही. त्यांना कळेल की मानसन्मान इथं मिळत होता. पण आता त्या रस्त्याने जाताना गद्दार म्हटलं जाईल तेव्हा कळेल” अशी टीका अनिल परब यांनी केली.
‘तुम्हाला उघड्यावर पडू देणार नाही’
“प्रत्येक वेळी चौपाटीवर मिटिंग व्हायची, तेव्हा प्रत्येकवेळी राजूला ताईंना तिकीट द्यायचो. पण आता होऊन जाऊद्या, आता कशा निवडून येतात त्या पाहू. काहीही किंमत मोजावी लागली, तरी चालेल. पण इथं आपलेच उमेदवार निवडून येतील. तुम्ही खंबीर उभे राहा, आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहू. तुम्हाला उघड्यावर पडू देणार नाही” असं अनिल परब म्हणाले.