गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट हे दोन्ही पक्ष पुन्हा एकदा एकत्र येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. एकीकडे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे, तर दुसरीकडे दोन्ही पवार देखील एकत्र येणार असल्याची चर्चा होत आहे. यावर आता राष्ट्रवादीच्या खासदार सुनेत्रा पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे, त्या पंढरपूरमध्ये महिला मेळाव्यात बोलत होत्या.
नेमकं काय म्हणाल्या सुनेत्रा पवार?
राजकारण आणि कुटुंब या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, दोन्ही पक्ष एकत्र येणार ही फक्त चर्चा आहे. जे काही होईल ते आपण बघालच असे म्हणत दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणारवर प्रतिक्रिया देताना सुनेत्रा पवार यांनी हात जोडत, या विषयावर अधिक बोलणं टाळलं आहे.
वैष्णवी हगवणे प्रकरणावर प्रतिक्रिया
दरम्यान पुण्यातील विवाहिता वैष्णवी हगवणे हीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे, सासरच्या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचा आरोप होत आहे, या घटनेनं संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे, यावर देखील सुनेत्रा पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वैष्णवी हगवणे बाबत झालेल्या घटनांचे समर्थन करत नाही, अशा घटना व्हायला नको आहेत. पक्षाने याबाबत भूमिका मांडलेली आहे. महिला आयोगाकडून दिरंगाई होते याबाबत सुद्धा पक्षाच्या पदाधिकाऱ्याने भूमिका मांडलेली आहे, अशी प्रतिक्रिया या प्रकरणावर सुनेत्रा पवार यांनी दिली आहे.
लाडकी बहीण योजेनेवर प्रतिक्रिया
ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांच्या आत आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे, या योजनेंतर्गत महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये जमा केले जातात. मात्र अजूनही वाढीव रकमेबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही, यावर बोलताना सुनेत्रा पवार यांनी म्हटलं की, लाडक्या बहिणींच्या वाढीव हप्त्याबाबत अजितदादा निर्णय घेतील, ते जे बोलतात ते करतात, आपल्याला माहीत आहे.